दोनेक वर्षांपूर्वी समाजसेवक अण्णा हजारे दिल्लीत आले की विमानतळ ते नवीन महाराष्ट्र सदनापर्यंत त्यांच्या मागे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी असत. तेव्हा अण्णांचा ‘टीआरपी’ चांगला होता. शिवाय देशभर बातमी पोहोचवायची असेल तर कोणत्या वृत्तसंस्थेचा प्रमुख आल्यावर बोलायचे हे तत्कालीन सहकारी सुरेश पठारे अण्णांना सांगत असत. पण गेल्या दोन दिवसांपासून अण्णा दिल्लीत आहेत. रामलीला मैदानावर सभा घेणार होते. पण समोर गर्दी नव्हती. त्यामुळे वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे नव्हते. त्यात अण्णांची तब्येत ‘बिघडली’ आणि ते सभेला पोहोचलेच नाहीत. बरं महाराष्ट्र सदनात अण्णांची खोली तळमजल्यावर आहे. तेथे जावं, तर सुरक्षारक्षकांचा गराडा. गेल्या तीन वर्षांत पहिल्यांदाच अण्णा प्रसारमाध्यमांना टाळत आहेत. आज, गुरुवारी अण्णांनी नवीन महाराष्ट्र सदनातल्या दुसऱ्या मजल्यावरील कक्षात बैठक घेतली. ही बैठक संपल्यावर जीना वा लिफ्टने जाण्याऐवजी अण्णा मागच्या ‘फायर एक्झीट’ दाराने बाहेर पडले. का तर म्हणे प्रसारमाध्यमांना टाळण्यासाठी. ‘फायर एक्झिट’ मधून ‘पार्किंग’ओलांडत अण्णांनी धावत-पळत आपली रूम गाठली. त्यामुळे छायाचित्रकारांची मोठी निराशा झाली. अण्णा कधी सुरक्षारक्षकांच्या मागे तर कधी धावत-पळत छायाचित्रकारांना टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. कधीकाळी जनलोकपाल आंदोलन भडकपणे घराघरात पोहोचवणाऱ्या प्रसारमाध्यमांचे कौतुक करताना अण्णा थकत नसत. पण आता अण्णांचे दर्शनही पत्रकारांना दुरापास्त झाले आहे.

गेले सांगायाचे राहुनी..
पुण्याचे (मावळते!) खासदार सुरेश कलमाडी यांच्या नशीबी शब्दश वनवास आला आहे.  ‘घडाळ्याचे’ काटे व्यवस्थित चालत होते, तोपर्यंत कलमाडी यांचे सोनियांच्या दरबारी चांगले वजन होते. मागच्या निवडणुकीत वेळ चांगली होती म्हणून ‘बारा’ गावचं पाणी पिणाऱ्यांची ‘मती’ कलमाडींनी गुंग केली होती. पण काटे उलटे फिरू लागले आणि कलमाडींची वाईट ‘वेळ’ सुरू झाली. कधीकाळी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सामन्यांच्या प्रवेशिका मिळवण्यासाठी वारंवार फोन करणारे आजकाल कलमाडींचा फोनही घेत नाहीत. आता हेच बघा ना! लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनानंतर सोनिया गांधी यांनी झाडून साऱ्या काँग्रेस खासदारांना भोजनासाठी निमंत्रित केले. पण त्यात कलमाडींना निमंत्रण नव्हते. आता सहजासहजी घरी बसतील, तर ते सुरेशभाई कसले? त्यांनी गाडीने थेट भोजनस्थळ गाठले. पण दारावरच त्यांची वाट रोखली गेली. ‘मी पुण्याचा खासदार आहे’ वैगेरेवैगेर सांगूनही ‘द्वारपाल’ बधेनात. त्याचवेळी पश्चिम बंगालचे खासदार अभिजित प्रणव मुखर्जी तेथे धडकले. त्यांच्याकडेही निमंत्रण नव्हते. त्यामुळे त्यांनाही रोखण्यात आले. रात्री उशिरा केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री राजीव शुक्ला यांनी खासदार मुखर्जीची भेट घेवून झाल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली. हे वृत्त समजताच कलमाडीदेखील शुक्लांची वाट पाहत बसले. पण शुक्ला आले नाहीत व कलमाडींची सोनियांना भेटण्याची इच्छापूर्ती झाली नाही. अर्थात त्यांना स्वतसाठी उमेदवारी नकोच आहे. फक्त काँग्रेसच्या उमेदवाराला पाडण्यासाठी त्यांनी निश्चित केलेल्या ‘बजेट’चा आकडा त्यांना मॅडमना सांगायचा होता!