आंध्र प्रदेशमध्ये रविवारी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वायएसआर काँग्रेसचे निवडणूक चिन्ह पंखा असल्याने मतदान केंद्रातील सर्व पंखे काढून टाकावेत, अशी मागणी या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एका अपक्ष उमेदवाराने निवडणूक आयोगाकडे केल्याने यापूर्वीही निवडणूक चिन्हांवरून निर्माण झालेल्या वादांच्या स्मृतींना उजाळा मिळाला आहे.
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या बसपचे निवडणूक चिन्ह ‘हत्ती’ आहे. ‘ये हाथी नही गणेश है, ब्रह्मा, विष्णु, महेश है’ अशी लोकप्रिय घोषणा देऊन मायावती यांनी उत्तर प्रदेशात बसपाची सत्ता आणली होती. पुढील निवडणुकीपर्यंत या ‘हत्ती’चे पुतळे अनेक ठिकाणी उभारण्यात आले आणि तेच अडचणीचे ठरले. त्यामुळे गेल्या निवडणुकीत हत्तींचे हे पुतळे निवडणुकीच्या कालावधीत झाकून ठेवण्याची वेळ आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक चिन्ह ‘घडय़ाळ’ आहे, ‘घडी’ नावाच्या साबणाच्या ब्रॅण्डच्या पिशवीवर घडय़ाळाचे चित्र असून त्यांची घोषणा ‘पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे’ अशी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘इस्तेमाल’ करण्यात आला असला तरी त्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे, अशी सर्वसाधारण चर्चा असल्याने उद्या कदाचित त्या साबणाच्या जाहिरातीवरही बंदी घालण्याची मागणी करण्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  आंध्र प्रदेशातील अपक्ष उमेदवाराने मतदान केंद्रांवरील पंखे काढून टाकण्याची मागणी करताना, निवडणूक चिन्हाचा वापर मतदान केंद्र आणि त्याच्या नजीकच्या परिसरात करता येत नसल्याची कायद्यात तरतूद असल्याचा आधार दिला आहे. त्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसचे निवडणूक चिन्ह ‘हात’ असल्याने त्याचे काय करावयाचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.