राज्यात अजिबात मोदी लाट नसल्याचा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार किंवा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रचारात केवळ नरेंद्र मोदी यांनाच केंद्रस्थानी ठेवून त्यांनाच लक्ष्य केले आहे.
नरेंद्र मोदी यांची लाट असल्याचा दावा भाजपच्या वतीने करण्यात येत असला तरी मोदी यांचा राज्यात प्रभाव नाही, असा दावा मुख्यमंत्री चव्हाण यांनी केला आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचाराला रंग चढला असून, सत्ताधाऱ्यांचे ठिकठिकाणी मेळावे सुरू झाले आहेत. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी मोदी यांना न्यायालयाने क्लिनचिट दिल्याचा मुद्दा मांडून शरद पवार यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. प्रचाराच्या भाषणात मात्र मोदी यांनाच पवार लक्ष्य करीत आहेत. आजच डोंबिवलीमध्ये झालेल्या सभेत पवार यांनी मोदी यांच्यावर कोरडे ओढले. पवार किंवा मुख्यमंत्री या दोघांच्याही भाषणात मोदी यांच्या धोरणावर टीका करण्यात जास्त वेळ दिला जातो. विकासासाठी मोदी भाषणांमध्ये गुजरातचे उदाहरण देतात. पण गुजरातपेक्षा विकासात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा आहे. दोन्ही राज्यांच्या विकासाबाबत आपण मोदी यांना जाहीरपणे चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे. पण त्यांच्याकडून काही प्रतिसाद दिला जात नाही, असे मुख्यमंत्री चव्हाण यांचे म्हणणे आहे.
मोदी यांना लक्ष्य केल्याशिवाय मतांमध्ये वाढ होणार नाही याचा अंदाज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना आला असावा. यामुळेच काँग्रेस व राष्ट्रवादीच्या दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या नेत्यांनी मोदी यांच्या विरोधात भाषणबाजी सुरू केली आहे. मोदी यांच्या विरोधात मुद्दा शोधून तो तापविण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. दुष्काळाच्या वेळी  मेहसाणा दूध महासंघाने पशुखाद्य दिले होते. याबद्दल गुजरात सरकारने मेहसाणा दूध संघाकडे २२ कोटींची मागणी केल्याचा मुद्दा सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने लावून धरला आहे.
मोदी यांचा राज्यात प्रभाव असल्याशिवाय सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते त्यांना लक्ष्य करणार नाहीत, अशीच प्रतिक्रिया भाजपच्या वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.
प्रचारात पवार किंवा मुख्यमंत्री या दोघांच्याही भाषणात मोदी यांच्या धोरणावर टीका करण्यात जास्त वेळ दिला जातो. मोदी यांच्या विरोधात मुद्दा शोधून तो तापविण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.
२० एप्रिलला सोनिया गांधींची मुंबईत जाहीर सभा
लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या मुंबईतील उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची २० एप्रिल रोजी मुंबईत जाहीर सभा होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वांद्रे- कुर्ला संकुलातील मैदानावर ही सभा होणार आहे.