लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसच्या नेत्यांचे खच्चीकरण झाले असून आता पक्षातील नेत्यांनी एकमेकांवरच टीकेचे आसूड ओढण्यास सुरुवात केली आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वक्षमतेवरच प्रहार केला आहे. सत्तारूढ पक्षाला साजेशी मनोवृत्तीच राहुल गांधी यांच्याकडे नाही, असे दिग्विजयसिंग यांनी म्हटले आहे.
गोव्यातील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिग्विजयसिंग यांनी राहुल यांच्यावर हल्ला चढविला आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करून एनडीएला शिंगावर घेण्याची जबाबदारी स्वीकारावयास हवी होती. मात्र मनोवृत्तीचा विचार करता राहुल गांधी हे सत्तारूढ पक्षासाठी साजेसे नाहीत, तर अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांची मानसिकता आहे, असे दिग्विजयसिंग म्हणाले.
निवडणुकीतील पराभवानंतर स्वपक्षीय आणि पक्षत्याग केलेल्या नेत्यांकडून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे नेतृत्वाचा अभाव असल्याची टीका केली जात आहे. त्या पाश्र्वभूमीवर दिग्विजयसिंग यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केल्याने काँग्रेसच्या गोटात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
दिग्विजयसिंग हे काँग्रेसचे गोवा प्रभारी असून ते दोन दिवसांच्या भेटीसाठी येथे आले आहेत. पक्षाचा कारभार आणि प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांशी ते चर्चा करणार आहेत. राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावे, अशी सूचना आपण केली. मात्र ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर ती जबाबदारी सोपविण्यात आली, असे ते म्हणाले.
लोकशाहीत विरोधी पक्षाचे स्थान आवश्यक आणि अबाधित आहे. काँग्रेस हा सर्वात मोठा विरोधी गट असल्याने राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारावयास हवी होती, असेही दिग्विजयसिंग म्हणाले.