भाजप नेते नितीन गडकरी यांची पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेऊन सेना-भाजपमध्ये राजकीय धमाल उडवून देण्यात राज ठाकरे यशस्वी झाले असले तरी लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत एकाही उमेदवाराला संकेतही न दिल्यामुळे मनसेमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. ‘आप’नेही १६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून ‘महाराष्ट्रात ‘आप’चे बाप असल्याचे’ सांगणारे राज कोणता मुहूर्त शोधत आहेत, असा सवाल कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
अवघ्या सात वर्षांचा पक्ष आणि दुसरीच लोकसभा निवडणूक लढवायची असताना किमान काही प्रमुख जागांसाठी उमेदवार निश्चित करून त्यांना महिनाभर आधी तरी प्रचाराला लागण्याचे संकेत देणे अपेक्षित असताना राज ठाकरे हे निवडणूक लढविणार आहेत का, असल्यास किती जागा लढविणार आणि आजपर्यंत एकाही उमेदवाराला निवडणूक लढविण्याचे संकेत का दिले नाहीत याबाबत काहीही सांगता येणार नाही, असे ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लोकसभा निवडणुकीसाठी किती जागा लढविता येतील याचा आढावा नाशिक येथे पक्षातर्फे घेण्यात आला त्यावेळी मनसेच्या अनेक भागातील पदाधिकाऱ्यांनी योग्य उमेदवार नसल्याचे सांगितले होते.
ईशान्य मुंबईत मनसेचे तीन आमदार असून एकही आमदार निवडणूक लढविण्यास इच्छुक नाही. तशीच परिस्थिती नाशिक येथे असून तेथे डॉ. पवार यांना उमेदवारी देण्याचे घाटत आहे. राज यांच्या भाषणांना राज्यभरात गर्दी होते तसेच त्यांचे आकर्षणही प्रचंड असले तरी पक्षबांधणी करण्यात फारसे यश न आल्यामुळे विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तसेच ठाण्यातही सक्षम उमेदवार मिळण्यात अडचणी आल्याचे एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.