भाजपच्या बळाची चाचपणी करण्याकरिता विभागनिहाय मेळावे घेतल्यानंतर आता निरीक्षकांमार्फत भाजपने जिल्हानिहाय सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यामुळे स्वबळावर जाण्याची तर ही चाल नाही ना, अशी शंका शिवसेनेच्या गोटात आहे. भाजप-शिवसेना दोन्ही पक्षांकडून सर्व २८८ जागा लढविण्यासाठी पडद्याआड तयारी सुरू असून महायुती भक्कम असल्याचा दावा मात्र दोघांकडूनही केला जात आहे.
भाजपच्या राज्य परिषदेत स्वबळावर लढण्याची मागणी अनेक पक्षनेते व कार्यकर्त्यांनी केली होती. त्यानंतर सुकाणू समितीच्या सदस्यांनी विभागवार पक्षाचे मेळावे घेतले आणि कार्यकर्त्यांच्या मानसिकतेचा अंदाज घेतला. शिवसेनेबरोबर युती नको, अशी भूमिका जवळपास सर्वच विभागात कार्यकर्त्यांनी मांडली. शिवसेनेकडून मिळणाऱ्या वागणुकीबद्दलही राग व्यक्त करण्यात आला. एका खासगी एजन्सीमार्फत राज्यभरात भाजपच्या ताकदीबाबतचे पाहणी करण्यात येत असून त्यांचा प्राथमिक अहवाल लवकरच अपेक्षित आहे. काही मतदारसंघाबाबत त्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे अहवाल पाठविल्याचेही समजते.
त्याचबरोबर आता भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना निरीक्षक म्हणून प्रत्येक जिल्ह्य़ात पाठविण्यात येत असून सर्व जागांचा अंदाज घेण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले आहे. शिवसेना लढवीत असलेल्या मतदारसंघातीलही भाजपची ताकद किती आहे, लोकसभा निवडणुकीत किती मते वाढली, कोणते नेते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, कोणाचे काम किती आहे, मतदारसंघाची रचना कशी आहे, आदी तपशील गोळा करण्यात येत आहे. महायुती भक्कम असल्याचा दावा करीत असताना शिवसेनेच्या मतदारसंघातीलही ताकदीचा अंदाज घेण्याची भाजपची चाल ओळखून शिवसेनेकडूनही जय्यत तयारी करण्यात येत आहे. भाजपने ऐनवेळी दगा दिल्यास कोठेही तयारी कमी पडू नये, अशा सूचना शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना देण्यात आल्या आहेत.