पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील सरकारने केलेल्या भ्रमनिरासावर भर देत, येत्या विधानसभा निवडणुकीत थापाडय़ांना मते देऊ नका, हेच कॉंग्रेस पक्षाच्या प्रचाराचे मुख्य सूत्र राहणार असल्याचे पक्षाचे निवडणूक प्रचार प्रमुख व उद्योग मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी येथे जाहीर केले.
निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर शहरातील विविध कार्यक्रमांसाठी आलेल्या राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, लोकसभा निवडणुकीच्या काळात मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने प्रचार करताना आश्वासनांचे वातावरण निर्माण केले होते. पण प्रचारात सांगितले एक आणि कृती मात्र वेगळीच, असे चित्र गेल्या दोन महिन्यांत जनतेपुढे आले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत थापाडय़ांना मतदान न करता विकासकामांकडे बघून मतदान करण्याचे आवाहन आम्ही जनतेला करणार आहोत.  राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर आघाडीचे सूत्र पक्षश्रेष्ठी सांगतील त्या प्रमाणे ठेवण्यात येईल, असे स्पष्ट करुन राणे म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्य़ात कॉंग्रेसकडे असलेल्या जागा राष्ट्रवादीला हव्या असल्यास त्या ऐवजी याच जिल्ह्य़ातील जागा द्याव्या लागतील, अशा धोरणाचा मी आग्रह धरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात मी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी, हेही पक्षश्रेष्ठी ठरवतील, असे सांगत राणे यांनी पक्षनेतृत्वापुढे पूर्ण शरणागती पत्करल्याचे संकेत दिले.