मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक लढविण्याचा जाहीर केलेल्या निर्णयाचा महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र   फडणवीस यांनी स्पष्ट केले असले तरी मनसेला कमी लेखून चालणार नाही, अशी सावध भूमिकाही घेतली आहे. मात्र मनसेच्या निर्णयाची दखल घेण्यापेक्षा त्यांना फारसे महत्त्व न देण्याचे भाजप नेत्यांनी ठरविले आहे.
मनसेचा प्रभाव गेल्या काही वर्षांत कमी झाला असून लोकसभा निवडणुकीत त्यांची मते आधीच्या निवडणुकीपेक्षा निम्म्याने कमी झाली. मोदी लाटेत मनसेला फटका बसला असला तरी विधानसभा निवडणुकीत त्यांची कामगिरी सुधारण्याची शक्यता आहे. तरीही मोदी यांच्या लाटेचा फायदा विधानसभेतही भाजपला मिळण्याची खात्री महायुतीच्या नेत्यांना आहे. मनसेविरोधात आक्रमक भूमिका घेऊन त्यांना राजकीय लाभ देण्यापेक्षा निवडणूक तयारीवर लक्ष केंद्रित करण्याचे भाजपने ठरविले आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असल्याने त्यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी राजकीय व्यूहरचना भाजप करीत आहे. मनसेपेक्षा त्याकडे आमचे अधिक लक्ष असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.