भारतीय जनता पक्षाचे(भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाने तक्रार दाखल करण्याचा दिलेला आदेश घाई आणि संतापातून घेण्यात आल्याचे भाजप नेते अरुण जेटली यांनी म्हटले आहे.
नरेंद्र मोदींच्या बाबतीत कायदेशीर तरतुदींचा लावलेला अर्थ चुकीचा असल्याचेही ते म्हणाले.
गुजरातमधील गांधीनगर येथे मतदान केल्यानंतर नरेंद्र मोदींनी निवडणूक चिन्ह ‘कमळा’सोबत फोटो आणि पत्रकारपरिषद घेतली होती. याविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. निवडणूक आयोगानेही मोदींच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले.
यावर अरुण जेटली म्हणाले की, “फौजदारी कायद्यातील तरतुदी अशा लांबविल्या जाऊ शकत नाहीत आणि मतदान केंद्राच्या परिसराबाबत योग्य ते स्पष्टीकरण आयोगाने देणे गरजेचे होते. मूळात नरेंद्र मोदी माध्यमांशी बोलत असताना मतदान केंद्रात नव्हते. तसेच इतर नेते मतदान झाल्यानंतर ज्याप्रमाणे माध्यमांशी बोलतात, त्याचप्रमाणे मोदीही मतदान केल्यानंतर बाहेर जमा झालेल्या माध्यमांना प्रतिक्रिया देत होते. त्यामुळे जेव्हा घटनात्मक संस्था अशी घाई आणि काहीप्रमाणात रागाच्या भरात निर्णय घेत असतात तेव्हा ते आपल्या मुख्य उद्दीष्टांना गमावत असतात.” असेही जेटली म्हणाले. तसेच “जाहीर सभा ही जाहीर सभेसारखीच असते. माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया जाहीर सभा होत नाही. त्यामुळे निवडणूकी दिवशी राजकीय नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया दाखविण्यावर बंदी घालण्यात आली, तर हे भाषण स्वातंत्र्याच्या अधिकाराला डावळण्यात आल्यासारखे होईल. त्याचबरोबर मतदानानंतर प्रतिक्रिया न देण्याची अशाप्रकारची कोणतीही तरदूत करण्यात आलेली नाही.” असेही जेटली यांनी आपल्या ब्लॉगवर म्हटले आहे.