अत्यंत चुरशीच्या आणि उभ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मोदी विरुद्ध केजरीवाल या निवडणूक लढतीच्या पूर्वसंध्येस उत्तर प्रदेश पोलीस आणि निवडणूक अधिकारी यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रादेशिक कार्यालयावर छापा घातला. या छाप्यात प्रचाराचे साहित्य जप्त करण्यात आले. मात्र या धाडीचा भाजपने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. प्रचार थंडावल्यानंतरही पक्षाकडून प्रचार साहित्य मोठय़ा प्रमाणात सिग्रा परिसरात पाठविण्यात आले आहे, अशी तक्रार आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. तर प्रचार केल्यानंतर उरलेले साहित्य कार्यालयात होते. पक्षाकडून कोणताही प्रचार केला जात नव्हता, असा दावा भाजपने केला आहे. तसेच निवडणूक आयोग भाजपशी पूर्वग्रहदूषित पद्धतीने वागत असल्याचा आरोपही भाजपने केला आहे. जप्त केलेल्या प्रचार साहित्यात, टी-शर्ट, माहितीपत्रके, बिल्ले यांचा समावेश आहे.