२००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीच्या दिवशी हजारो लोकांनी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाद्वारे माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता हे संकेतस्थळ काही मिनिटांतच ठप्प झाले होते. परंतु, यंदा १६ मे रोजी म्हणजेच मतमोजणीच्या दिवशी मात्र निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ विनाविलंब व्यवस्थित सुरू होते. त्यामुळेच एकाच दिवशी आयोगाच्या संकेतस्थळाला विक्रमी ४५ कोटी हिट्स मिळाल्या. एकाच दिवसात एका भारतीय संकेतस्थळाला एवढय़ा मोठय़ा संख्येने हिट्स मिळणारे हे पहिलेच संकेतस्थळ ठरले आहे.
 लोकसभा निकालाच्या दिवशी म्हणजेच १६ मे रोजी सकाळी ६ वाजता माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञांचा चमू कार्यरत झाला. तेव्हापासून ते थेट दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सर्व मतदारसंघांचे निकाल, आकडेवारी व अन्य आवश्यक माहिती संकेतस्थळावर ‘अपलोड’ केली जाईपर्यंत निरंतर कार्यरत होता. देशभरातील ९८९ मतमोजणी केंद्रे आणि १ लाख २९ हजार इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन नियंत्रण केंद्रे यांचे समन्वयन या माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञांच्या चमूने केले.