मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पक्षाचे निवडणूक चिन्ह दाखवून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध दोन प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आले आहेत. मोदी यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश बुधवारी दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरातचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना दिले होते. त्यानंतर तातडीने कार्यवाही करीत मोदी यांच्याविरोधात दोन एफआयआर दाखल करण्यात आले. यासंबंधी सविस्तर अहवाल पाठविण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने राज्य प्रशासनाला दिले होते.
आदर्श आचारसंहितेमध्ये लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम १२६ (१ए) आणि १२६ (आय) नुसार कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवारा मतदानाच्या ४८ तास आधी प्रचार साहित्याचा किंवा निवडणूक चिन्हाचा वापर करता येत नाही. मात्र, मोदी यांनी मतदानाची प्रक्रिया सुरू असतानाच पक्षाचे निवडणूक चिन्ह सातत्याने दाखविल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोदी यांचे पत्रकार परिषदेतील भाषणाचे थेट वार्तांकन करणाऱया वृत्तवाहिन्यांवरही कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.