भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव हे सिंहांच्या प्रश्नांवरून एकमेकांवर गुरगुरत आहेत.
उत्तर प्रदेशचे सरकार गुजरातमधील सिंहांना हाताळण्यात असमर्थ ठरत असल्याची टीका मोदी यांनी बरेलीतील एका सभेत केली. गिरच्या राष्ट्रीय उद्यानात सिंह मुक्तपणे कसे संचार करीत आहेत, ते पाहावयास यावे, असे निमंत्रणही मोदी यांनी या वेळी यादव यांना दिले. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे सिंहांची मागणी केली, आम्ही सिंह दिले, सिंहांना पाहून त्यांच्यात काही बळ येईल असे वाटले, मात्र गुजरातच्या सिंहांना ते समर्थपणे हाताळूही शकले नाहीत, त्यामुळे त्यांना पिंजऱ्यात बंद करावे लागले. नेताजी (मुलायमसिंग) आपला पुत्र, सूनबाई, बंधू यांनी गिरच्या जंगलात यावे आणि सिंह कसे मुक्त संचार करतात ते पाहावे, असे मोदी म्हणाले.
अखिलेश यादव यांनीही यावरून मोदींवर निशाणा साधला. मोदी यांनी असे वक्तव्य करण्याची गरज नव्हती कारण राजकीय सदिच्छेपोटी हे सिंह देण्यात आले होते. मोदी यांनी आम्हाला काही तरी दिले त्या बदल्यात आम्ही त्यांना दिले आहे, असे यादव म्हणाले.लखनऊमधील प्राणी संग्रहालयाला अलीकडेच आपण भेट दिली, तेव्हा तेथील सिंहांनी आपले दोनदा स्वागत केले. आपण प्राणी संग्रहालयात गेलो तेव्हा प्रथम सिंहांनी आपले स्वागत केले. त्यानंतर प्राणी संग्रहालयातून बाहेर पडताना, आपल्याला उत्तर प्रदेशात आणले म्हणूनही, सिंहांनी आपले आभार मानले, असे अखिलेश हसतहसत म्हणाले.

राजकीय नेत्यांची मुले रिंगणात
नवी दिल्ली:राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे पुत्र अभिजित यांच्यापासून ते राहुल आणि वरुण गांधी यांच्यासह लोकसभेच्या किमान ५० मतदारसंघांत विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांचे पुत्र आणि कन्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. यापैकी बहुसंख्य उमेदवार हे काँग्रेस पक्षाचे आहेत. अभिजित मुखर्जी हे जांगीपूर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार असून राहुल गांधी आणि वरुण गांधी हे अनुक्रमे अमेठी आणि पिलिभीत मतदारसंघांतून रिंगणात आहेत. केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती चिदम्बरम हे तामिळनाडूतील शिवगंगा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

सोनिया गांधी, पवार यांची शनिवारी नागपुरात सभा
मुंबई : काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची शनिवारी नागपूरमध्ये संयुक्त जाहीरसभा आयोजित करण्यात आली आहे.  गेल्या लोकसभा निवडणुकीत सोनिया आणि पवार यांची संयुक्त सभा भंडारा-गोंदिया मतदारसंघातील उमेदवार प्रफुल्ल पटेल यांच्या मतदारसंघात आयोजित करण्यात आली होती. यंदा पटेल यांच्या मतदारसंघाबरोबरच नागपूरमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. नागपूरमध्ये नितीन गडकरी यांचा पराभव करणे हे काँग्रेसचे उद्दिष्ट आहे. यातूनच सोनिया आणि पवार यांच्या संयुक्त सभेसाठी नागपूरची निवड करण्यात आली.