07 July 2020

News Flash

संक्षिप्त : आसामात फेरमतदान

आसामातील सात मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानास चांगला प्रतिसाद मिळाला असून ६५.५ टक्के मतदान झाले.

| April 18, 2014 12:01 pm

आसामातील सात मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानास चांगला प्रतिसाद मिळाला असून ६५.५ टक्के मतदान झाले. आसाममधील बराक खोरे परिसरात असलेल्या करीमगंज आणि सिलचर लोकसभा मतदारसंघांसाठी गुरुवारी पुनर्मतदान झाले. सिलचर येथे ६६ तर करीमगंज येथे ६५ टक्के मतदान झाले. १२ एप्रिल रोजी झालेल्या मतदानावेळी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्यामुळे येथे पुनर्मतदान घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली होती.
मतदान करण्यापूर्वीच मृत्यू
बालासोर : मतदान करण्यासाठी रांगेत उभे असतानाच एका मतदाराचा मृत्यू झाला. बालासोर सदर मतदारसंघात ही दुर्घटना घडली. नरेंद्र जेना असे सदर इसमाचे नाव असून त्यांचे वय ५० वर्षे होते. तालबराई मतदान केंद्रावर रांगेत उभे असताना हृदयविकाराचा झटका आल्याने ते कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याआधीच त्यांचे निधन झाले होते.
उत्तर प्रदेशातील आँवला नगर लोकसभा मतदारसंघातील एका मतदानकेंद्रावर हरी सिंग या २५ वर्षीय तरुणाने स्वत:ला पेटवून घेतल्याने एकच खळबळ उडाली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले पण तोवर त्याचे प्राणोत्क्रमण झाले होते. या आत्मदहनामागचे कारण शोधले जात आहे.
मुलायम पंतप्रधानपदासाठी इच्छुक
मणिपुरी : लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात तिसऱ्या आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास आणि सपाला अधिक जागा मिळाल्यास आपण पंतप्रधानपदासाठी दावा करू, असे समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंग यादव यांनी गुरुवारी स्पष्ट केले.  पंतप्रधानपदासाठी दावा करणार का, असा प्रश्न विचारल्यानंतर यादव यांनी आपण उत्सुक असल्याचे सांगितले. तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय सपाने घेतला आहे. त्यामुळे अधिक जागा मिळाल्यास इतर मित्रपक्षांशी चर्चा करून पंतप्रधानपदाबाबतचा निर्णय घेऊ,असेही यादव यांनी सांगितले.  लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सर्व समविचारी पक्षांचे नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे सर्वाशी चर्चा केल्यानंतर  तिसऱ्या आघाडीच्या नेतृत्वाबद्दल निवडणुकीनंतरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. सर्वच क्षेत्रात पसरलेला भ्रष्टाचार  कॉंग्रेस पक्षाला त्रासदायक ठरेल असेही ते म्हणाले.
हॉटेलच्या आगीतून ममता बचावल्या
माल्दा : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी माल्दा जिल्ह्य़ात आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गुरुवारी हॉटेलमध्ये लागलेल्या आगीतून थोडक्यात बचावल्या. ममता बॅनर्जी राहत असलेल्या हॉटेलमधील त्यांच्या खोलीतील वातानुकूलित यंत्राला आग लागली होती. मात्र त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळीच धाव घेत त्यांना खोलीतून बाहेर काढले.
मोदींविरोधात काँग्रेसचे ‘सीडी’ अस्त्र
नवी दिल्ली :  नरेंद्र  मोदी यांच्या तीन वर्षांपूर्वी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी केलेल्या टीकेची सीडी काँग्रेसकडून उघड करण्यात आली आह़े  मोदी हे विध्वंसक आहेत आणि गुजरातचा विकास हे केवळ ढोंग आहे, अशा शब्दांत भारती यांनी या सीडीत मोदींची निर्भत्सना केली आह़े  भाजपमधून बाहेर पडल्यानंतर उमा भारती यांनी भारतीय जनशक्ती पार्टीची स्थापना केली होती़  त्या काळात भारती मोदींवर कठोर टीका करीत होत्या़  त्या दरम्यानच्या एका कार्यक्रमात उमा भारती यांनी, गुजरातमध्ये हिंदू प्रचंड भयग्रस्त असल्याचेही म्हटले होत़े  त्याची चित्रफीत अभिषेक सिंघवी यांनी प्रसिद्ध केली आह़े
मोदी धोकादायक; आंबेडकरांची टीका
मुंबई : गुजरातमध्ये विकासाच्या नावाखाली बडय़ा उद्योगपतींनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना ब्लॅकमेल करून अनेक सवलती लाटल्या. असा ब्लॅकमेलिंगला बळी पडणारा नेता पंतप्रधान होणे धोक्याचे आहे, अशी टीका भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. बडय़ा उद्योगपतींनी गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्याकडून कवडीमोल किमतीने जमिनी घेतल्या, इतर सवलती मिळवल्या आणि सवलतीच्या दरांतील विकासाचे मॉडेल तयार केले. परंतु भाजपचीच सत्ता असलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील मुख्यमंत्र्यांनी मोदींचे विकासाचे गुजरात मॉडेल स्वीकारले नाही. उद्योजकांच्या ब्लॅकमेलिंगला बळी पडणारे मोदी आंतराष्ट्रीय शक्तींच्या ब्लॅकमेलिंगलाही बळी पडू शकतात आणि अशी व्यक्ती देशाची पंतप्रधान होणे धोक्याचे आहे, असे आंबेडकर म्हणाले. या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसणार आहे. त्याला तो पक्षच जबाबदार आहे. धर्मनिरपेक्षतेचे तत्व काँग्रेसने सोडून दिले आहे. काँग्रेसविरोधात नाराजी आहे. या पक्षाला शंभरच्या आतच जागा मिळतील, असे भाकित त्यांनी केले. जनता पर्यायाच्या शोधात असून निकालातून ते दिसून येईल, असे ते म्हणाले.

‘काँग्रेसची मोदीटीका अपयश झाकण्यासाठीच’
कल्याण : नरेंद्र मोदी यांच्यावर व्यक्तिकेंद्रीत टीका करून काँग्रेस नेते केंद्र सरकारमधील अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेस सरकार हे घोटाळेबाज आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी कल्याण येथे महायुतीच्या सभेत केली. महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारसाठी ते कल्याणमध्ये आले होते. यावेळी विनोद तावडे, मनोहर जोशी, आदित्य ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. देशात सर्वाधिक काळ काँग्रेसने सत्ता उपभोगली तरी विकासाच्या बाबतीत देश मागे का?, विकासासाठी काँग्रेस सरकारला आणखी किती वेळ पाहिजे, असा प्रश्न करून भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकलेले हे घोटाळेबाज सरकार आहे, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर तोफ डागली. देशात सरकार बनवण्यासाठी महायुतीचे उमेदवार मत मागत नाहीतर तर देशाच्या प्रगतीसाठी आम्ही मते मागत आहोत. देशात भाजपप्रणीत सत्ता आल्यानंतर महाराष्ट्रात युतीची सत्ता येईल, असा विश्वाही त्यांनी व्यक्त केला. महायुती अभेद्य असल्याचा निर्वाळा त्यांनी यावेळी दिला.
तरुणाला अटक
महायुतीच्या सभेच्या ठिकाणी नागेंद्र राय (३५, आझमगड, उत्तरप्रदेश) हा पिस्तूल व दहा काडतुसांसह फिरत असल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे आझमगडचे परवानाधारी पिस्तूल आहे. आचारसंहितेपूर्वी सर्व शस्त्र जमा करण्यात आली असताना नागेंद्रने ते का जमा केले नाही याची चौकशी पोलीस करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2014 12:01 pm

Web Title: election news in short
Next Stories
1 निवडणूकीच्या लाईव्ह अपडेट्सला वाचकांचा उदंड प्रतिसाद
2 राज्यात मतदानाचा टक्का वाढला
3 शिवसेना मोदींच्या सलाइनवर ; राज यांची ठाण्यात टीका
Just Now!
X