देशातील शेवटच्या टप्प्याचे मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलची आकडेवारी येण्यास सुरूवात झाली आहे. दिल्लीत भारतीय जनता पक्ष(भाजप) बाजी मारून ५-७ जागा जिंकण्याची शक्यता आहे. तसेच लोकसभेच्या रिंगणात पहिल्यांदाच आपले नशीब आजमवणाऱया आम आदमी पक्षाला दिल्लीत २ जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसवर मात्र नामुष्की ओढावण्याचे संकेत आहेत. दिल्लीत काँग्रेसला खातेही उघडता येणार नसल्याची शक्यता ‘सीएनएन-आयबीएन’ आणि ‘सीएसडीएस’ने एक्झिट पोल सर्वेक्षणाने जाहीर केली आहे. 
* बिहार-  नितीश कुमारांच्या ‘जेडीयू’ला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून त्यांच्या खात्यात केवळ ५ जागा आणि भाजप येथेही १९ जागांवर सरशी घेण्याची शक्यता आहे. तसेच लालूप्रसाद यादव यांच्या ‘राजद’ला १० जागा मिळण्याची शक्यता आहे.
* पश्चिम बंगाल- येथे तृणमूल काँग्रेसची जादू चालण्याची शक्यता असून ममता बॅनर्जींना २४ जागांवर तर, डावी आघाडी १२, काँग्रेस ५ आणि भाजपला केवळ एका जागेवर यश मिळण्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
* महाराष्ट्र-  महायुती बाजी मारण्याची शक्यता असून भाजप-२१, शिवसेना ११, काँग्रेस- ९, राष्ट्रवादी- ६, आम आदमी- १ अशी आकडेवारी ‘एबीपी-नेल्सन’च्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. असे झाल्यास राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून दुहेरी आकडाही गाठता न आल्याची काँग्रेसची ही पहिलीच वेळ ठरेल.
* पंजाब- पंजाबमध्येही भाजप आघाडीवर राहणार असून ६ ते ९ जागा भाजपच्या खात्यात, तर काँग्रेसला केवळ ३ ते ५ जागांवर यश मिळण्याची शक्यता सर्वेक्षणातून समोर आली आहे. आम आदमी पक्षाला १ ते ३ जागा मिळण्याची साशंकता सर्वेक्षणाने वर्तविली आहे.
* तमिळनाडू– काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून तेथे काँग्रेसला खातेही उघडता येणार नाही आणि जयललिता २२ ते २८ जागा आपल्या खात्यात जमा करण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे तमिळनाडूत जयललिता सरकार स्थापिले जाण्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
* केरळ- येथे काँग्रेससाठी सकारात्मक सर्वेक्षण समोर आले आहे. काँग्रेसला येथे ११ ते १४ जागा मिळण्याची शक्यता आहे.
* उत्तरप्रदेश- सर्वेक्षणानुसार ‘भाजप’ चा वारू उत्तरप्रदेशात यावेळी थैमान घालेल आणि यातून मुलायम सिंग यांच्या समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपला येथे ४५ ते ५३ जागांवर यश मिळण्याची शक्यता असून समाजवादी पक्षाच्या खात्यात १३ ते १७ आणि मायावती यांच्या बहुजन समाजवादी पक्षाला १० ते १४ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र, राहुल गांधी  उत्तरप्रदेशात आपली छाप पाडू  शकणार नाहीत. काँग्रेसला येथे केवळ ३ ते ५ जागांवर यथ मिळविता येईल असे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

देशभरात एकंदर आघाडीनुसार ‘एक्झिट पोल’ सर्वेक्षणातील बलाबल-
एनडीए- २५२
यूपीए- ९७
अन्य- १६१
आप- ४