‘पेडन्यूज’ प्रकरणी निकाल विरोधात गेल्याने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची डोकेदुखी वाढली असून, लोकसभेत निवडून आल्यास त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते का, या मुद्दय़ावर मात्र कायदेशीर तज्ज्ञांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत.
‘आदर्श’ घोटाळ्याचे भूत मानगुटीवर असतानाच आता ‘पेडन्यूज’चे प्रकरण मागे लागल्याने अशोक चव्हाण यांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ संपलेले नाही. राजकीय पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने त्यांच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे. लोकसभेत निवडून आले तरी त्यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार कायम राहणार आहे.
लोकप्रतिनिधी कायद्यानुसार निवडणूक आयोगाने एखाद्याला अपात्र ठरविल्यास पुढे तीन वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले जाते. सर्वोच्च न्यायालयाने ४५ दिवसांत निर्णय घेण्याचे निकालात नमूद केले आहे. म्हणजेच १६ मेच्या निकालानंतर निवडणूक आयोगाने अपात्रतेचा निर्णय घेतला तरी नांदेड मतदारसंघातून निवडून आल्यास अशोक चव्हाण यांची खासदारकी वाचू शकते, असे काही ज्येष्ठ वकिलांचे म्हणणे आहे. मात्र १६ तारखेपूर्वी अपात्रतेचा निर्णय झाल्यास त्यांच्या खासदारकीवर परिणाम होऊ शकतो.
तीन वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत. खासदारकी किंवा आमदारकी रद्द करण्याचे अधिकार आयोगाला नाहीत. अशोक चव्हाण यांच्या निवडीला आव्हान देणारी पराभूत उमेदवार डॉ. माधव किन्हाळकर यांची याचिका तांत्रिक कारणावर उच्च न्यायालयाने फेटाळली होती. सर्वोच्च न्यायालयात त्याला आव्हान देण्यात आले असता तेथे फेटाळण्यात आली. यामुळेच निवडणूक आयोगाने अशोक चव्हाण यांना तीन वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घातली तरी त्यांची खासदारकी राहू शकते का, याबाबत दोन मतप्रवाह आहेत. अपात्रतेच्या संदर्भात निवडणूक आयोगाच्या आदेशाला अशोक चव्हाण हे न्यायालयात आव्हान देऊ शकतात. मात्र नांदेडमध्ये निवडून आले तरी त्यांची खासदारकी रद्द होईल, असे डॉ. किन्हाळकर यांचे मत आहे.
डॉ. किन्हाळकर यांनी पाठपुरावा केला
शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात गृह खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम केलेल्या डॉ. किन्हाळकर यांनी अशोक चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढविलीच पण पराभूत झाल्यावर सातत्याने निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा केला. चव्हाण यांनी गैरकृत्याचा अवलंब केल्यानेच आपण त्यांच्या विरोधात कायदेशीर लढा दिला, असे किन्हाळकर यांनी सांगितले. पेडन्यूजप्रकरणी चव्हाण नक्कीच दोषी ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.