मायावती यांच्या उत्तर प्रदेशातील राजवटीच्या काळात कॅबिनेट मंत्रिपद भूषविणारे नंदगोपाळ गुप्ता उपाख्य नंदी आणि त्यांची महापौर पत्नी अभिलाषा यांची बहुजन समाज पक्षातून (बसप) हकालपट्टी करण्यात आली आह़े  पक्षाविरोधी कारवायांचा आरोप ठेवून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आह़े
पक्षशिस्तीचा भंग न करण्याबाबत या दाम्पत्याला वारंवार बजावण्यात आले होते; परंतु पक्षाच्या या सूचनांकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले, अशी माहिती बसपचे विभागीय समन्वयक विजय प्रताप यांनी हकालपट्टीची घोषणा करताना दिली़  ही कारवाई लोकसभा निवडणुकांच्या ऐन तोंडावर करण्यात आल्यामुळे यामागील राजकारणाची चर्चा रंगली आह़े
पक्षाकडून करण्यात आलेले आरोप गुप्ता दाम्पत्याने फेटाळून लावले आहेत़  तसेच माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष केशरीदेवी पटेल यांच्या इशाऱ्यावरून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आह़े  पटेल या अलाहाबादमधून बसपच्या संभाव्य उमेदवार असल्याचेही मानण्यात येत़े  त्यांना आव्हान ठरणाऱ्या प्रत्येकाविरोधात पटेल अशाच पद्धतीने कारस्थाने करीत आह़े  पक्षाचे अनेक निष्ठावंत सोडून जाण्याला पटेलच कारणीभूत आहेत़  आम्हाला अद्यापही बसपप्रमुख मायावती यांच्याबद्दल आदर आह़े त्यांची साथीदारांकडून दिशाभूल करण्यात येत आहे, असेही नंदी यांनी म्हटले आह़े नंदी उद्योगपती असून त्यांनी २००७ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वीच पक्षप्रवेश केला़