भारतात येत्या १६ मे नंतर स्थानापन्न होणाऱ्या सरकारबरोबर आम्ही अधिक निकटतेने काम करून, पुढील काळही दोन्ही देशांसाठी स्थित्यंतराचा राहील असे मत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केले आहे.
लोकसभेची निवडणूक यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल भारतीय जनतेचे कौतुक करताना त्यांनी म्हटले आहे, की जगातील एका मोठय़ा लोकशाही देशातील या निवडणुकांना ऐतिहासिक महत्त्व आहे. ओबामा यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे, की नवीन सरकार स्थापन होण्याची आम्ही वाट पाहात आहोत. दोन्ही देशांसाठी पुढील काळही स्थित्यंतराचा राहील. गेल्या दहा वर्षांत अमेरिका व भारत यांच्यात मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित झाले, त्यामुळे दोन्ही देशांतील नागरिक सुरक्षित झाले, त्यांची भरभराट झाली व दोघांनी मिळून जागतिक आव्हानांना तोंड देण्याचे प्रयत्न करण्यात आले.
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने भारतातील जनतेचे निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल अभिनंदन केले आहे. अधिक महत्त्वाकांक्षी विषय घेऊन आगामी भागीदारीला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहोत असे परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी सांगितले.