राज्यात नेतृत्वबदलाची मोहीम असो वा राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी मतांची जुळवाजुळव; कोणत्याही निवडणुकीत महत्त्वाच्या घडामोडींचे केंद्रबिंदू असलेले माजी उपराष्ट्रपती अथवा माजी पंतप्रधान यांचे आवडीचे, मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर असलेले ‘रिट्झ’ हॉटेल बंद पडल्याने राजकीय घडामोडींचा महत्त्वाचा अड्डाच थंडावला.
वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्रिपदावरून बदलण्याचा निर्णय झाल्यावर नव्या नेतृत्वाच्या निवडीच्या साऱ्या हालचाली ‘रिट्झ’मधूनच झाल्या होत्या. जेव्हा केव्हा राज्यात मुख्यमंत्री बदलण्याची हवा गरम होई तेव्हा ‘रिट्झ’मध्ये राजकीय घडामोडींना वेग येई. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत आमदारांच्या फोडाफोडीला नेहमीच जोर येतो. तेव्हा आमदारांना गळाला लावण्याकरिता किंवा त्यांच्यासाठी ‘लक्ष्मीदर्शन’ही येथूनच होत असे. म्हणूनच अशा अटीतटीच्या निवडणुकांच्या वेळी ‘रिट्झ’समोर गुप्तचर पोलिसांचा वावर असायचा. कोण नेता आला कोण त्याच्या बरोबरचे येऊन गेले यावर लक्ष ठेवले जाई. मध्यंतरी झालेल्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला पाडण्याकरिता ‘रिट्झ’मधूनच कशा बॅगा पुरविल्या गेल्या याची चर्चा चांगलीच रंगली होती. तेव्हा सत्ताधारी पक्षाचेच काही आमदार गळाला लागल्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कानावर आले. आघाडीकडे चांगले संख्याबळ असतानाही त्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या मधू जैन केवळ सहा मतांनी विजयी झाल्या होत्या. माजी उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत, माजी पंतप्रधान चंद्रशेखर हे जेव्हा केव्हा मुंबईत येत तेव्हा त्यांचा मुक्काम याच हॉटेलमध्ये असायचा. ५०७ क्रमांकाचे दालन तर चंद्रशेखर यांचे आवडते होते. धुळ्याचे आमदार अनिल गोटे, माजी आमदार कन्हैयालाल गिडवाणी, जयंत मल्होत्रा या नेत्यांचा अड्डा याच हॉटेलात असायचा. माजी खासदार आबासाहेब खेबूडकर कुलकर्णी यांच्याकडे या हॉटेलची पूर्वी मालकी होती. नंतर दिल्लीतील कपूर यांनी ते विकत घेतले. मात्र गेले दीड वर्षे दुरुस्तीच्या नावाखाली हे हॉटेल बंदच आहे. मध्यंतरी हे हॉटेल पाडून नव्याने त्याची बांधणी होणार, अशी कुजबूज होती. एका बडय़ा नेत्याशी संबंधित कंपनी हे हॉटेल विकत घेणार, अशी चर्चा आहे.