‘भारत-अमेरिका अणुकरारादरम्यान’ डाव्या पक्षांच्या विरोधाला न जुमानता विश्वासदर्शक ठरावास सामोरे दाखविण्याचा कणखरपणा दाखविणारे व्यक्तिमत्त्व ते काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान देशाबाहेर असताना ‘साफसफाई’विरोधी वटहुकूमाबाबत खळबळजनक विधाने केल्याने व्यथित झालेले व्यक्तिमत्त्व, अशा शब्दांत भारतीय पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या संमिश्र प्रवासाचे वर्णन करावे लागेल. जनमत चाचण्यांमध्ये काँग्रेसच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले जात असतानाच शनिवारी पंतप्रधान आपला राजीनामा सादर करतील.
रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नरपद, देशावर आर्थिक संकट आले असताना केंद्रीय अर्थमंत्रिपद आणि २००२ मधील दंगलींच्या पाश्र्वभूमीवर अचानक ‘आतल्या आवाजा’मुळे गळ्यात पडलेले पंतप्रधानपद, अशा तिन्ही पदांच्या धुरा त्यांनी राष्ट्रीय बांधीलकीने वागवल्या, मात्र आपल्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात सरकारी भ्रष्टाचाराची उघडकीस आलेली असंख्य प्रकरणे, वाढत्या महागाईसह प्रत्येकच आघाडीवर सरकारला येत गेलेले अपयश यांचे ग्रहण त्यांना लागले.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीची नोंद घेताना ‘सत्ताबाह्य़ सत्ताकेंद्रामुळे देशाचे सर्वात कमकुवत पंतप्रधान’ अशीच घेतली जाईल. अत्यंत स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीने देशाच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकारचे नेतृत्व करावे हा विरोधाभासच, पण पंतप्रधानांवर तीही वेळ आली. १९९१ मध्ये आर्थिक संकट उभे राहिले असताना आवश्यक निर्णय घेण्याचे धाडस तत्कालीन पंतप्रधान-अर्थमंत्री नरसिंह राव आणि मनमोहन सिंह यांनी दाखवले होते.
अन् पंतप्रधानपदाची माळ गळ्यात..
२००४ मध्ये काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधानपदी विदेशी व्यक्ती असावी की नसावी यावरून वादळ उठले. आणि सोनिया गांधींच्या आतल्या आवाजाने साद घातल्याने कधीही नाव चर्चेत नसताना एकदम पंतप्रधानपदाच्या उमेदवारीची माळ डॉ. मनमोहन सिंग यांच्या गळ्यात पडली.
इटलीतील ख्रिश्चन धर्मीय असलेल्या सोनिया गांधी यांची शिफारस आणि देशाचे तत्कालीन मुस्लीम राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याकडून शपथ दिली जाणारे डॉ. मनमोहन सिंग हे देशाचे पहिले शीख पंतप्रधान ठरले. त्यातही राज्यसभेचे सदस्य असलेले आणि पंतप्रधानपद भूषविणारे मनमोहन सिंग हे पहिलेच व्यक्तिमत्त्व. भारतीय पंतप्रधानांचा जन्म फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या पंजाब प्रांतात झाला होता.
उत्तम सकल राष्ट्रीय उत्पन्न दर आणि सर्वाधिक घोटाळे
पंतप्रधानांच्या सलग दहा वर्षांच्या कारकिर्दीत बराच काळ देशाचा सकल राष्ट्रीय उत्पन्नवाढीचा दर ८.५ टक्के होता, पण कोळसा खाणवाटप घोटाळा, राष्ट्रकुल घोटाळा, ‘टू जी’ घोटाळा आणि त्यातून धोरणलकव्याचा सरकारवर केला जाणारा आरोप अशी मनमोहन सिंग यांची संमिश्र कारकीर्द होती.
महत्त्वाचे निर्णय
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना,  माहिती हक्क कायदा, अन्न सुरक्षा योजना, भारत-अमेरिका नागरी अणू सहकार्य करार, जागले संरक्षण कायदा, भूसंपादन कायदा