नरेंद्र मोदी यांना मते देणाऱ्या भारतीय नागरिकांना समुद्रात बुडवायला हवे, अशी विखारी शब्दांत नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी आपल्या भावना प्रचारसभेत बोलताना व्यक्त केल्या. अब्दुल्ला यांच्या विधानांमुळे भारतीय जनता पक्षात संतापाची लाट उसळली असून आमच्या धर्मनिरपेक्षतेसाठी केंद्रीय मंत्र्यांच्या प्रशस्तिपत्राची गरज नाही, अशी प्रतिक्रिया भाजपने दिली आहे.
भारतात जर जातीयवादी शक्ती फोफावल्या तर जम्मू आणि काश्मीर हे राज्य अशा भारतात राहू इच्छित नाही. हे राज्य भारतातून बाहेर पडेल, असा फुटिरतावादी दावा नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि मावळते केंद्रीय मंत्री फारुक अब्दुल्ला यांनी केला. आपल्या प्रचार रॅलीस ते संबोधित करीत होते.
भारतीय जनता पक्षाचे नेते गिरिराज सिंह आणि विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया यांच्यावर अब्दुल्ला यांनी चांगलेच शरसंधान केले. ‘माझी देवाकडे एकच प्रार्थना आहे की, हा देश जातीयवादी शक्तींच्या हातात पडू देऊ नकोस. दुर्दैवाने या देशावर ती वेळ आलीच तर मात्र काश्मीर या देशाचे अविभाज्य अंग राहणार नाही’, असे खन्यार येथील सभेत अब्दुल्ला म्हणाले.
आम्ही नाही, ‘ते’च चोर..
पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाचे मुफ्ती मोहम्मद सईद आमच्यावर मतांची चोरी करीत असल्याचा आरोप करतात, पण त्यात तथ्य नाही. खरे मते चोरणारे ते आहेत. या म्हणजे, चोराच्या उलटय़ा बोंबाच झाल्या, अशा शब्दांत अब्दुल्ला यांनी सईद यांच्यावर टीकास्त्र सोडले. काश्मीरमधील जनता गरीब असल्यानेच त्यांच्यावर अशी चोरी करण्याची वेळ येते. हे समर्थन नाही. पण आता हे चित्र बदलण्याचीच गरज आहे, असेही ते पुढे म्हणाले.
फारुख अब्दुल्ला यांच्या प्रचार सभेत स्फोट?
येथील खन्यार भागात केंद्रीय मंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या सभेत आज स्फोटांचे आवाज आले. हे आवाज ग्रेनेडचे असावेत असा दावा प्रत्यक्षदर्शीनी केला असला तरीही रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी या वृत्तास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पोलीस त्याबाबत चौकशी करीत आहेत. प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्यांनी सांगितले की, श्रीनगर लोकसभा मतदारसंघातील खन्यार भागात अब्दुल्ला हे निवडणूक प्रचारसभेसाठी येत असताना कानठळ्या बसविणारे आवाज झाले. त्यामुळे उपस्थित लोकांमध्ये घबराट उडाली. सुदैवाने या घटनेत कुणी जखमी झाल्याचे वृत्त नाही.