घाटकोपर येथील एक माणूस गाडय़ांच्या शोरूममध्ये येतो, १३ बोलेरो गाडय़ांची मागणी नोंदवतो, साडेआठ लाख रुपयांच्या या गाडीसाठी तो केवळ ७४ हजार रुपये भरतो आणि गाडय़ा सिंधुदुर्ग-रत्नागिरी येथे पोहोचत्या करण्यास सांगतो. विशेष म्हणजे उर्वरित रक्कम भरण्याची कोणतीही खात्री नसताना या गाडय़ा सिंधुदुर्गातील ‘त्या’ पत्त्यावर पोहोचतातही.. लोकसभेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अत्यंत अजब वाटणारा हा कारभार आता निवडणूक आयोगाच्याही नजरेत आला आहे. निवडणूक आयोगाने प्राप्तिकर खात्याला याबाबत सूचित केले असून हे प्रकरण राज्याच्या राजकीय वर्तुळातील अनेक बडय़ा नेत्यांना भोवण्याची शक्यता आहे.
स्वीस बँकेमध्ये खाते असलेल्या ७०० भारतीय नावांमध्ये महाराष्ट्रातील काही राजकीय नेत्यांचीही नावे असल्याने ते प्राप्तिकर खात्याच्या नजरेत आधीच भरले आहेत. मात्र एका प्रकरणामुळे आता प्राप्तिकर खात्याने आपली चौकशी अधिकच विस्तृत केली आहे. ‘जी ३ मोटर्स लि.’ या गाडय़ांच्या डीलरकडे १३ बोलेरो गाडय़ांची ऑर्डर नोंदवण्यात आली. ही ऑर्डर देणारी व्यक्ती घाटकोपरहून आल्याचे सांगण्यात आले होते. या व्यक्तीचे नाव गरोडिया असल्याचे समजते. डीलरला प्रत्येक गाडीचे ७४ हजार रुपये देऊन त्या गाडय़ा नोंदवल्या होत्या. हे पैसे त्याने रोख दिले होते. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका पत्त्यावर या गाडय़ा पोहोचवण्याची व्यवस्था केली होती.
विशेष म्हणजे ७४ हजार रुपयांपेक्षा एकही पैसा जास्त मिळाला नसतानाही या १३ गाडय़ा सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोहोचवण्यात आल्या. या गाडय़ा ज्या व्यक्तीने नोंदवल्या होत्या, ती व्यक्ती कंपनीच्या संचालकांच्या ओळखीची होती, असेही चौकशीत समोर आले आहे. आता प्राप्तिकर खात्याचे लोक गरोडियाच्या मागावर असून या कंपनीच्या संचालकांचीही चौकशी होणार आहे.