निवडणुकीचे दगदगीचे काम केल्यावरही त्याचे पूर्ण मानधन न मिळाल्याने घाटकोपर येथील मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांनी अपुरी रक्कम परत करीत निषेध नोंदविला. या कर्मचाऱ्यांना न्याहारी न देताही त्याचे दीडशे रुपये कापून घेण्यात आल्याने हे कर्मचारी संतप्त झाले. यावरून त्यांची विभागीय अधिकाऱ्यांशी वादावादी झाली. रात्री नऊनंतरही मतपेटय़ा हालविल्या गेल्या नसल्याने आणि मानधनावरून असंतोष निर्माण झाल्याने या केंद्रावर उशिरापर्यंत गोंधळ सुरू होता.
घाटकोपर (प.) येथील अमृतनगरमधील सेंट फ्लॉवर हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला. या ठिकाणी १० मतदान केंद्रे होती. प्रत्येक ठिकाणी किमान सहा कर्मचारी होते. त्यांना न्याहारी देण्यात आली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. तो न देता त्यापोटीचे दीडशे रुपये कापून घेऊन १२५० रुपये देण्यात आले. त्यामुळे हे कर्मचारी संतप्त झाले. न्याहारीही नाही आणि त्यापोटीच्यो पैशांनाही पाय फुटल्याने त्यांनी मानधनाची रक्कम परत केली. विभागीय अधिकारी मात्र काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ही वादावादी रात्री उशिरापर्यंत सुरू होती, अशी माहिती या केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी दिली.