भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे नाराज असलेल्या शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी बुधवारी चर्चा केली. मनसेला ‘रालोआ’ मध्ये सामील करण्याचे भाजपचे कोणतेही प्रयत्न नसल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले. भाजपच्या ज्येष्ठ केंद्रीय नेत्यांशीही ठाकरे यांची या बाबीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
गडकरी आणि राज ठाकरे भेटीमुळे मुंडेही नाराज आहेत. महाराष्ट्रात निवडणुकांची सर्व जबाबदारी पक्षाने दिली असतानाही गडकरी हस्तक्षेप करून मित्रपक्षांशी असलेले स्नेहसंबंध बिघडवीत आहेत. रिपब्लिकन पक्ष, स्वाभिमानी संघटना यांच्यासारख्यांना रालोआबरोबर घेऊन निवडणुकीसाठी वातावरण तयार करण्यासाठी मुंडे प्रयत्नशील असताना शिवसेनेसारख्या अतिशय जुन्या मित्रपक्षाला निवडणूक काळात नाराज करणे चुकीचे असल्याचे काही भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. राज ठाकरे यांच्याशी भेटीआधी आपल्याला आधी काही कल्पनाही दिली जात नसेल, तर राज्याची निवडणूक जबाबदारी देऊन उपयोग काय, यामुळे वातावरण बिघडून त्याचा परिणाम निवडणूक निकालांवर झाला, तर त्याची जबाबदारी गडकरी घेणार का, असे मुंडे समर्थकांना वाटत आहे.
मनसेबाबत आपल्याशी सल्लामसलत न करता निर्णय घेतले जात असल्याने नाराज असलेल्या मुंडे यांनी प्रदेश नेत्यांच्या बैठकीलाही गारपिटीच्या निमित्ताने येण्याचे टाळले. आपल्याला न विचारता काही नेते पावले टाकत असतील, तर उमेदवारीचे निर्णयही त्यांनीच घ्यावेत, असा उद्देश त्यामागे होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी निश्चित करण्यात आलेली नाही आणि विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार ठरविण्यात आलेले नाहीत.