दिल्लीत सत्तास्थापनेसाठी वरिष्ठ भाजप नेत्यांच्या हालचाली सुरू असताना त्यात कुठेच सहभागी नसलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी केंद्रात मंत्रीपद किंवा महाराष्ट्रात नेतृत्व यापैकी पंतप्रधान व पक्ष सोपवेल, ती कोणतीही जबाबदारी स्वीकारण्याचा पवित्रा पत्रकारांशी बोलताना घेतला. तत्पूर्वी भाजपच्या राज्य कार्यसमितीच्या बैठकीत भाषण करताना आपण पक्षासाठी केलेल्या कार्याचे दाखले देत राज्य पदाधिकाऱ्यांपुढे ‘नाराजी’नाम्याचा अंक त्यांनी सादर केला. मला बाजूला करायचे तर करावे आणि कोणालाही नेतृत्व द्यावे, असा त्रागाही त्यांनी आपल्या भाषणात केला.
दिल्लीत घडामोडींना आणि भेटीगाठींना वेग आला आहे. या पाश्र्वभूमीवर मुंडे यांना मंत्रीपद मिळणार की नाही, याची चर्चा सुरू आहे. मंत्रिपद अथवा राज्यात नेतृत्व यापैकी कोणती जबाबदारी स्वीकारण्यास आवडेल, असे पत्रकारांनी विचारता मुंडे यांनी मंत्रिपदाचा निर्णय पंतप्रधान घेतात असे सांगून राज्यात पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्याची तयारी असल्याचे सांगितले.
नवी दिल्लीत सत्तास्थापनेची समीकरणे जुळविण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी सुरू असताना मुंबईत मात्र मुंडे यांचे ‘नाराजी’ नाम्याचे नाटय़ सुरू होते. प्रदेश कार्य समिती बैठकीच्या प्रसिध्दीपत्रात नावाचा उल्लेख नसल्याने आणि पत्रकारपरिषदही प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने बोलाविल्याने प्रतिष्ठेचा मुद्दा उपस्थित करून ‘मला दूर करून कोणालाही नेतृत्व द्या, मी हवा आहे की नाही, ते सांगा,’ असे बोल त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ऐकविले.
या बैठकीसाठी येण्याचे मुंडे सकाळी टाळत होते. पण पांडुरंग फुंडकर, गिरीश महाजन यांनी त्यांना दादर येथील पक्ष कार्यालयात आणले. फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुंडे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सहभागी झाले. पक्षासाठी मी बरेच कष्ट घेतले. कोणाचे तिकीट कापण्यामध्ये संबंध नसतानाही अनेकदा नाराजी झेलावी लागली. काही निर्णयांमध्ये वाईटपणा घ्यावा लागला, पण मी फिकीर केली नाही. पक्षासाठी सारे काही सहन केले, असे मनोगत मुंडे यांनी पदाधिकाऱ्यांपुढे व्यक्त केले.
शिवसेनेबद्दल तक्रारी
खुद्द मुंडे यांचा बीड मतदारसंघ, सांगली अशा काही मतदारसंघात शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजप उमेदवारांसाठी काम न केल्याच्या तक्रारी भाजप नेत्यांनी बैठकीत केल्या. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर स्नेहसंबंध असलेल्या मुंडे यांच्यासाठीच जर शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते काम करणार नसतील, तर अन्य उमेदवारांचे काय, असा प्रश्नही काही नेत्यांना पडला. एक-दोन ठिकाणी अशा तक्रारी आल्याचे मुंडे यांनी मान्य केले, मात्र आगामी विधानसभा निवडणुका शिवसेनेसोबत आणि महायुती म्हणूनच लढविल्या जातील, अशी ग्वाही पत्रकारांना दिली.