ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे अजूनही नाराज असून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका राज्यात आपल्या नेतृत्वाखाली पक्ष लढवेल आणि त्यांना अधिकार राहतील, हे पक्षनेतृत्वाने पुन्हा स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पण त्याकडे फारसे लक्ष दिले जाण्याचे चिन्ह नाही. लोकसभा निवडणुका तोंडावर असताना भाजपमध्ये संभ्रम आणि निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि केंद्रात राजनाथसिंह हेच निर्णय घेऊन बोलतील, असे रुडी यांच्याकडून स्पष्ट करण्यात आल्याने मुंडे यांचे राज्यात स्थान काय, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नितीन गडकरी यांच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवरून भाजप-शिवसेनेत निर्माण झालेले वादळ अजूनही थंडावण्याची शक्यता नाही. उद्धव ठाकरे यांची जाहीर नाराजी व्यक्त झाल्यावर भाजपचे प्रभारी राजीव प्रताप रुडी, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी चर्चा करून ती दूर करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात निर्णयाचे अधिकार कोणाकडे, असा प्रश्न उद्धव यांनी केल्यावर राज्यात फडणवीस आणि केंद्रात राजनाथसिंह हेच सर्व काही ठरवतील, असे स्पष्ट करण्यात आले. गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष असताना राज्यात निवडणुका मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढविण्याची घोषणा तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली होती. गडकरी व मुनगंटीवर दोघेही पदावरून गेल्यानंतर राजनाथसिंह यांनी मुंडे यांनाच राज्यात निवडणुकांबाबत अधिकार दिले असले तरी गडकरी यांच्या राज ठाकरे भेटीनंतर मुंडे कमालीचे नाराज झाले आहेत.
मुंडे यांनी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागांत फिरून आणि काही राजकीय नेत्यांना भाजपसोबत आणून पक्षात चैतन्य आणले होते. महायुतीत पाच पक्षांचा समावेश झाला, काही नेते भाजपमध्ये आले, असे असताना गडकरी यांची शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या जवळिकीमुळे मुंडे यांची पंचाईत झाली असून ते नाराज आहेत.
त्यामुळे लोकसभा आणि विधान परिषद उमेदवार निश्चित करण्याच्या काही बैठकांपासून ते गारपीटग्रस्त भागाच्या दौऱ्याचे कारण देत अलिप्त राहिले. त्यांनी दूरध्वनीवरून काही नेत्यांशी चर्चा केली. पण केंद्रीय नेतृत्वाकडून आपले अधिकार स्पष्ट होत नाहीत आणि गडकरी यांना राज्यात ढवळाढवळ करण्यापासून रोखले जात नाही, तोपर्यंत मुंडे यांचे अलिप्त धोरण सुरूच राहण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.