आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विविध समाज घटकांसाठी सरकारने ‘खुशखबरीं’चा सपाटा लावला आहे. शनिवारपासून कोणत्याही उत्पन्नगटातील रुग्णास राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये औषधे आणि उपचार साहित्य मोफत मिळणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी विधानसभेत ही घोषणा केली. याबरोबरच १ जानेवारी १९९५ पर्यंतच्या झोपडय़ांचे झालेले हस्तांतरण नियमित करण्याबरोबरच राज्यातील १३८ तालुका मुख्यालयांचे नगरपालिका अथवा नगरपंचायतींमध्ये रुपांतर करण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला.
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजस्थानमधील तत्कालीन अशोक गेहलोत सरकारने मोफत औषधे देण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये अथवा आरोग्य केंद्रांमध्ये ४२९ प्रकारची अत्यावश्यक औषधे आणि १०७ साहित्ये रुग्णांना मोफत दिली जातील. यासाठी उत्पन्नाची मर्यादा ठेवण्यात आलेली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मोफत औषधांकरिता केंद्र आणि राज्य शासन ५१० कोटी रुपये खर्च करणार आहे. कर्करोग, हदयरोग यासारख्या गंभीर आजारावरील औषधांचा यामध्ये समावेश आहे.
राज्य शासनाने औषधांच्या खरेदीत पारदर्शकता आणल्याने खर्चात बचत झाल्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी सांगितले. आरोग्य खात्यात औषध खरेदीत काही ठराविक ठेकेदारांची मक्तेदारी होते. या ठेकेदारांची मक्तेदारी मोडीत निघाल्याने खर्चात बचत झाली. बचत झालेल्या खर्चामुळेच रुग्णांना मोफत औषधे उपलब्ध करून देणे शक्य झाल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
तालुका मुख्यालयांचे नगरपालिका किंवा नगरपंचायतींमध्ये रूपांतर करण्याच्या निर्णयामुळे राज्यात नव्या सात नगरपालिका आणि १३१ नगरपंचायती अस्तित्वात येणार आहेत. २५ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांना नगरपालिकेचा दर्जा देण्याची कायद्यात तरतूद आहे. यानुसार राजगुरूनगर खेड (पुणे), मोहोळ (सोलापूर), शिरोळ (कोल्हापूर), पलूस (सांगली), चंदवड (नाशिक), जामखेड आणि शेवगाव (नगर) या सात नव्या नगरपालिका अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला.
वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे पलूस, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे माळशरीस, आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांचे अकोला, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे पारनेर आदींच्या तालुका मुख्यालयांचे नगरपालिका अथवा नगर पंचायतींमध्ये रूपांतर झाले आहे.
नव्याने सात नगरपालिका आणि १३१ नगरपंचायती
ठाणे – वाडा, शहापूर, मुरबाड, विक्रमगड, मोखाडा, तलासरी
सिंधुदुर्ग – कुडाळ, वैभवाडी, डोडामार्ग
रायगड – सुधागड, तळा, पोलादपूर, माणगाव रत्नागिरी – मंडणगड, संगमेश्वर .