नव्या रालोआ शासनाने पहिलाच रेल्वे अर्थसंकल्प मंगळवारी लोकसभेत मांडला आणि आता त्यावरील चर्चेला सुरुवात झाली आह़े  मात्र शुक्रवारी जेव्हा हा अर्थसंकल्प चर्चेसाठी पटलावर आला, तेव्हा रेल्वेमंत्री सदानंद गौडा किंवा रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांच्यापैकी कोणीही सभागृहात उपस्थित नव्हत़े  त्यामुळे विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना नव्या शासनाची चांगलीच तारांबळ उडाली़
मंत्री उपस्थित नसल्याची संधी साधून काँग्रेसने शासनावर टीकेची झोड उठवली़  काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी, सध्याचे शासन पूर्णत: उदासीन असल्याचे म्हटल़े  आपण याबाबत रीतसर आपला निषेध नोंदवीत असल्याचे त्यांनी पीठासीन अधिकारी क़े व्ही़ थॉमस यांना सांगितल़े  अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना संबंधित विभागाचे मंत्री उपस्थित नसणे, यामुळे सभागृहाच्या प्रतिष्ठेला बाधा येत असल्याचा आरोपही त्यांनी केला़  अध्यक्षांनी चौधरी यांना रेल्वे अर्थसंकल्पावर बोलण्याची परवानगी दिल्यानंतर त्यांनी, जनहिताचे महत्त्वाचे प्रश्न चर्चिले जात असताना संबंधित खात्याचा एक तरी मंत्री सभागृहात उपस्थित असायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली़  तसेच संबंधित मंत्री उपस्थित असतानाच आपले मत मांडणार असल्याचे सांगितल़े
मात्र शासन हे सामूहिक जबाबदारीवर चालत़े  त्यामुळे रेल्वेमंत्री उपस्थित नसले, तरीही त्यांचे कॅबिनेटमधील सहकारी उपस्थित आहेत, असे सांगत थॉमस यांनी हा मुद्दा फेटाळून लावला़  परंतु, उपस्थित मंत्र्यांपैकी कुणीही संबंधित मंत्रालयाशी संबंधित नसल्याचे सांगत चौधरी यांनी सभागृह स्थगित करण्याची मागणी केली़  ही मागणी काँग्रेसचे सदस्य क़े सी़ वेणुगोपाळ, क्रांतिकारी समाजवादी पक्षाचे एऩ के. प्रेमचंद्रन आणि तृणमूलचे सौगता रॉय यांनीही उचलून धरली़
पीठासीन अधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या अनुपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त करीत संबंधित मंत्र्यांनी उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे म्हटल़े  त्यानंतर अर्थराज्यमंत्री निर्मला सीताराम यांनी, सदस्यांच्या भावनांचा आदर करीत असल्याचे सांगून अशी स्थिती पुन्हा उद्भवणार नाही, असे आश्वासन दिल़े त्यानंतर जेवणाच्या सुटीनंतर दहा मिनिटांतच गौडा आणि मनोज सिन्हा सभागृहात पोहोचले आणि त्यांनी सभागृहाची क्षमा मागितली़