उच्चभ्रूंची वस्ती, झोपडपट्टी आणि मध्यमवर्गीयांच्या सोसायटय़ा अशा तिन्ही स्तरांतील लोकांचा लक्षणीय समावेश असलेला आणि बहुसंख्य मराठीभाषक मतदार असलेल्या वायव्य मुंबई मतदारसंघात यंदाही विद्यमान खासदार व काँग्रेसचे उमेदवार गुरुदास कामत आणि शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांच्यात रंजक लढत होणार आहे. मराठी मतांच्या विभागणीसाठी मनसेच्या उमेदवाराची उपस्थिती आणि इतर विरोधी मतांच्या विभागणीसाठी ‘आप’च्या उमेदवाराचे अस्तित्व आणि समाजवादी पक्षाच्या उमेदवाराची गैरहजेरी असे सारे समीकरण जुळल्याने काँग्रेसविरोधी वातावरण आणि मोदी लाटेच्या प्रभावातही कामत यांच्यासाठी आशेचा किरण कायम आहे. तर मनसेच्या तुलनेत कमी झालेल्या प्रभावाचा वापर करून विजयासाठी आवश्यक मताधिक्य गोळा करण्यासाठी शिवसैनिकांना कामाला लावण्याचे आव्हान कीर्तिकरांपुढे आहे.
यंदा कामत आणि कीर्तिकर यांच्यासह ‘आप’चे मयांक गांधी आणि मनसेचे महेश मांजरेकर हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभा निवडणुकीतही सहापैकी चार मतदारसंघांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी होते. २०१२ मधील महापालिका निवडणुकीत मात्र ३६ पैकी २४ नगरसेवक युतीचे निवडून आले. पैकी २१ सेनेचे आहेत. एकंदरीत मोदी लाटेत युतीला अनुकूल असे गणित असतानाही शिवसेनेतील धुसफुसीमुळे आणि मनसेच्या उमेदवारामुळे युतीत धाकधूक आणि काँग्रेसच्याही आशा पल्लवीत, असे चित्र आहे.
मांजरेकरांना काँग्रेसची साथ
समाजवादी पक्षाने उमेदवारच उभा न केल्याने ती सारी मते काँग्रेसच्याच नावावर जमा होणार याची कामत यांना खात्री आहे. तसेच महेश मांजरेकर यांना जास्तीतजास्त मते मिळावीत, अशी मोर्चेबांधणीही काँग्रेस करीत आहे.
मतदार व्यवस्थापन
शिवसेना मुख्यत्वे देशभरातील ‘मोदी लाटे’वरच अवलंबून आहे. मागच्या अनुभवावरून मतदार मनसेला मत देऊन काँग्रेसची शक्ती वाढविणार नाहीत, हा विश्वासही जोडीला आहे. कार्यकर्त्यांनी मतदानाच्या दिवशी मतदारांना बाहेर काढण्यासाठी कीर्तिकरांना ‘मेहनत’ घ्यावी लागणार आहे. एकंदरच मतदारसंघातील मुद्दय़ांपेक्षा ‘मतदार व्यवस्थापनाला’च या मतदारसंघात सर्वात महत्त्व आले आहे.

मतदारांची टक्केवारी
(एकूण मतदार : १६ लाख ९८ हजार)
* मराठी : ४३ टक्के
* उत्तर भारतीय : १८ टक्के
* मुस्लिम : १७ टक्के
* गुजराती : ११ टक्के