मध्य प्रदेशचे कृषिमंत्री गौरीशंकर बिसेन यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याचे आदेश मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने लोकायुक्तांना दिले आहेत. बिसेन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असून त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयाने वरील आदेश दिले आहेत.
मुख्य न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्या. आलोक आराधे यांच्या खंडपीठाने, माजी आमदार किशोर समरिते यांनी केलेल्या जनहित याचिकेवर, वरील आदेश दिले.
बिसेन यांच्या नावावर १९९४ मध्ये अगदी नगण्य मालमत्ता होती. मात्र आता त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक यांच्या नावावर बालाघाट, पुणे आणि भोपाळमध्ये मोठी मालमत्ता आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. भ्रष्टाचार केल्याशिवाय इतकी मोठी संपत्ती गोळा करता येणे शक्य नाही, असेही याचिकाकर्त्यांने याचिकेत म्हटले आहे.बिसेन यांनी पुण्यात आपल्या कन्येच्या नावावर लाखो रुपये किमतीचा फ्लॅट घेतला आहे, बनावट नावाने बालाघाट येथे २.५ कोटी रुपयांची जमीन घेतली आहे, पत्नीच्या नावावर ९१ लाख रुपये किमतीची जमीन घेण्यात आली आहे, असेही याचिकेत म्हटले आहे.