केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नेहरू-गांधी घराण्यावरील निष्ठा कधीच लपवून ठेवली नाही. आपल्यासारखी सामान्य व्यक्ती गांधी कुटुंबामुळेच मोठी झाली, असे ते संधी मिळेल तेथे सांगत असतात. या मोठेपणामुळे कृतार्थ पावल्याच्या भावनेतून सुशीलकुमार शिंदे यांच्या मनात अलीकडे विरक्तीचे भाव घर करू लागले होते.. आता राजकारण पुरे, निवडणूक लढवायची नाही, सोलापूरला आराम करायचा, शेतावर बसून शांतपणे वाचन करायचे, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मित्रांसोबत रमायचे आणि राजकारणाच्या धबडग्यात राहून गेलेल्या गप्पांच्या मैफिली पुन्हा जमवायच्या असे विचार गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मनात घोळत होते. पण सुशीलकुमार शिंदेंचे ते स्वप्न साकारण्याची वेळ अजून आलेली नाही, असेच दिसू लागले आहे.लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या रालोआच्या विजयाचा बोलबाला सुरू झाल्यापासून काँग्रेसमध्ये बेचैनी आहे. अशा संकटाच्या काळात, एकएक मोहरा महत्वाचा ठरणार आहे. ज्यांच्या नावावर विजयाची मोहोर नक्की उमटणार आहे, असे मोहरेच माघार घेऊ लागले, तर?..
सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी तर, हा निष्ठेच्या कसोटीचा क्षण ठरला आहे.. म्हणूनच, आपले निवृत्तीचे स्वप्न गुंडाळून ठेवून त्यांना ‘नाईलाजाने’ निवडणुकीच्या रणात उतरावे लागणार आहे..  
निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा शिंदे यांनी केली तेव्हा, त्यावर अनेकांचा विश्वासच बसला नव्हता. राजकारणात एवढे स्थैर्य प्राप्त झालेले असताना कुणी निवृत्ती स्वीकारू शकतो का, या शंकेने उगीचचच अनेकांच्या मनाची चाळवाचाळव सुरू झाली होती. अनेकांना शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणाही आठवल्या होत्या. शरद पवार त्यांना शिष्य मानत नसले, तरी शिंदे मात्र पवारांनाच राजकारणातले गुरू मानतात. त्यामुळे, शिंदेंची निवृत्तीची घोषणादेखील शरद पवारांच्या अगोदरच्या घोषणांसारखीच वाऱ्यावर विरणार असेही काहींना वाटले होते.  पण शिंदेंचा निर्धार ठाम होता. निवृत्त व्हायचेच, आणि शेतावरल्या घरात गप्पांचा फड रंगवायचा, असे त्यांनी ठरविलेही होते. पण काँग्रेस संकटात असताना निवृत्तीचा आग्रह धरणे म्हणजे इतक्या वर्षांच्या निष्ठेशी प्रतारणा ठरणार, हे त्यांच्या संवेदनशील मनाने ओळखले. अखेर, सुशीलकुमार शिंदेना सोलापूरमधून निवडणुकीस उभे राहावे लागणारच.. मग चर्चा तर होणारच!