आपला जन्म झाला तेव्हा एका अज्ञात व्यक्तीने, ‘बेटी तो बोझ होती है’ असे आपल्या आईच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न करून आपल्याला ठार मारण्याची सूचनाही आईला केली. मात्र आपली आई निर्भय होती आणि तिने त्या अज्ञात व्यक्तीची सूचना अमलात आणली नाही. त्यामुळेच आज मी तुमच्यासमोर उभी आहे, असा गौप्यस्फोट केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी येथे केला.
स्त्रीभ्रूण हत्येबाबत काही विद्यार्थ्यांनी इराणी यांना प्रश्न विचारले असता त्यांनी प्रथमच हे गुपित उघड केले. स्त्रीभ्रूण हत्येसारखे प्रकार थांबलेच पाहिजेच आणि सरकारचेही त्यालाच प्राधान्य आहे, असेही इराणी म्हणाल्या. एखाद्या मुलीला आपण शिक्षण दिले की केवळ एका महिलेलाच शिक्षण देण्याचा तो प्रकार ठरत नाही तर एका कुटुंबाला शिक्षण दिल्यासारखे ठरते आणि त्याची देशाच्या उभारणीसाठी मदत होते, असेही त्या म्हणाल्या.
विविध राज्यांच्या अभ्यासक्रमात बदल असतात असे विचारले असता इराणी म्हणाल्या की, शैक्षणिक समानतेचा प्रश्न राष्ट्रीय शिक्षण धोरणात हाताळला जाईल. बेरोजगारीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शिक्षण आणि कौशल्यविकास यांची सांगड घालण्यास सरकार बांधील आहे, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, मानव संसाधन विकास मंत्रालय राष्ट्रीय पातळीवर ई-ग्रंथालय प्रकल्प निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे विशाल ज्ञानाची कवाडे उघडी होतील आणि यासाठी आंतरराष्ट्रीय ग्रंथालयांशीही समन्वय साधण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.