गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याच्या वृत्ताचे जोरदार खंडन करीत आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी, मी मेलो तरी भाजपशी समझोता करणार नाही, अशी घोषणा करीत भाजप नेत्यांना आव्हान दिले. पूर्व दिल्ली  लोकसभा मतदारसंघात रोड शो दरम्यान अरविंद केजरीवाल काँग्रेस व भाजपवर तुटून पडले. दिल्लीबाहेर विविध मतदारसंघात प्रचार करणारे केजरीवाल घरच्या मैदानात कमालीचे आक्रमक झाले होते. नरेंद्र मोदी यांनीच ही अफवा पसरवल्याचा आरोप त्यांनी केला. मोदींना पराभूत करण्यासाठीच वाराणसीतून निवडणूक लढवित असल्याचे केजरीवाल म्हणाले.
मुख्यमंत्री असताना काँग्रस-भाजपने संगनमताने सरकार पाडण्यासाठी कट रचला होता, असा गंभीर आरोप केजरीवाल यांनी केला. मी राजीनामा देऊन काही पाकिस्तानला पळालो नाही. उलट मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास धाडस लागते, असे धाडस भाजप-काँग्रेसच्या एकही नेत्याकडे नाही. मी जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवतो म्हणून माझ्यावर गुजरात व हरयाणामध्ये अंडी फेकली.
विधानसभा निवडणुकीत जसा विश्वास दाखवला तसाच विश्वास लोकसभा निवडणुकीतही दाखवा, अशी विनंती केजरीवाल यांनी केली. काँग्रेस-भाजपने भ्रष्ट चेहऱ्यांना उमेदवारी दिली. कोणत्याही परिस्थिीत त्यांना मत देऊ नका,असे आवाहन केजरीवाल यांनी केले.