‘आप’ने आपल्या पक्षाचा प्रचार व पक्षासाठी निधी गोळा करण्यासाठी अरविंद केजरीवार यांच्याबरोबर जेवण करण्यासाठी ‘दहा हजार रुपये व इच्छा असेल तर त्याहून जास्त भरा आणि अरविंद ‘केजरीवाल यांच्या बरोबर  चर्चा करीत जेवणाचा आस्वाद घ्या’ असा फंडा आजमाविला आहे. हे जेवण उद्या सायंकाळी येथील  होणार आहे. नागपुरात केजरीवाल यांच्या तीन सभा होणार असून त्यातील एक सभा १४ मार्च रोजी नागपूरला, त्यांनतर चंद्रपूर व भंडारा येथे होणार आहे. त्या त्या ठिकाणी या भोजनाचे आयोजन करण्यात आल्याचे आपच्या कार्यालयातर्फे सांगण्यात आले.  आतापर्यन्त जवळजवल २० ते २५ नागरीकांनी आपल्याकडे नोंद केली. असल्याचे आपचे नागपूर येथील आप पक्षाच्या प्रसिद्धी प्रमुख प्राजक्ता अतूल यांनी सांगितले. पक्षासाठी निधी गोळा करायची ही पद्धत अमेरीकेकडील असल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले.

केजरीवालांच्या सभेला परवानगी नाकारली
नागपूर : आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या १४ मार्चला कस्तुरचंद पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या सभेला महापालिकेने शांतता क्षेत्र असल्याचे कारण देऊन परवानगी नाकारली. महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने केजरीवालांची सभा होऊ नये म्हणून भाजपने प्रयत्न केल्याचा आरोप ‘आप’च्या उमेदवार अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत केला. ठरलेल्या कार्यक्रमानुसार केजरीवाल १४ तारखेला सकाळी साडेआठ वाजता नागपूर मतदारसंघातील उमेदवार अंजली दमानिया यांच्यासह छत्रपती चौकातून निघणाऱ्या परिवर्तन यात्रेत ते सहभागी होणार आहेत. परिवर्तन यात्रा खामला चौकातून निघून शहरातील विविध मार्गावरून फिरून मानस चौक व टी पॉइंट मार्गे कस्तुरचंद पार्कवर पोहोचणार होती, परंतु शांतता क्षेत्र असल्याचे कारण देऊन तेथे सभा घेण्यास महापालिकेने परवानगी नाकारली आहे.

लातूरमध्ये काँग्रेस उमेदवारीसाठी आज मतदान
लातूर:काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार लातूर लोकसभेचा उमेदवार काँग्रेसच्या ठरवून दिलेल्या मतदारांच्या माध्यमातून ठरणार असून, उद्या (गुरुवारी) हे मतदान होणार आहे.  दिवाणजी मंगल कार्यालयात सकाळी ९ ते ११ या वेळेत विविध विधानसभा मतदारसंघांतील १ हजार १५८ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतदानानंतर लगेच मतमोजणी होऊन विजयी उमेदवाराचे नाव काँग्रेस कमिटीकडे कळवले जाणार आहे, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे यांनी सांगितले.

पवनकुमार बन्सल यांना उमेदवारी ?
 नवी दिल्ली : रेल्वे लाचखोरी प्रकरणामुळे राजीनामा द्यावा लागलेले माजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांना चंदिगढमधून पुन्हा उमेदवारी देण्याच्या तयारीत काँग्रेस आहे. ‘पवनकुमार बन्सल यांच्यावर कोणतेही आरोपपत्र दाखल झालेले नाही. त्यामुळे त्यांना ‘कलंकित’ म्हणणे चुकीचे आणि अन्यायकारक आहे,’ असे सांगून काँग्रेसने त्यांची पाठराखण करण्यास सुरुवात केली आहे.

आंध्रमध्ये उद्योगपतीही सत्तेच्या रिंगणात
हैदराबाद:निवडणुकांच्या रिंगणात उतरून आपले नशीब अजमावू पाहणाऱ्यांमध्ये आंध्र प्रदेशातील केवळ सिनेतारका पुढे आहेत असे नाही, तर आता उद्योगपतीही या शर्यतीत धावू लागले आहेत़  अमर राजा बॅटरी लिमिटेड या कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गाल्ला जयदेव यांनी तेलगू देसम  पार्टीमध्ये प्रवेश केला असून त्यांना गुंटूर येथून लोकसभेची उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आह़े जयदेव यांच्याबरोबरच त्यांची माता आणि माजी मंत्री गाल्ला अरुणा कुमारी यांनीही काँग्रेसची साथ सोडून तेलगू देसमची कास धरली आह़े

रामकृपाल यादव भाजपमध्ये
नवी दिल्ली: लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय रामकृपाल यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सामाजिक न्यायाऐवजी लालूप्रसाद घराणेशाहीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोपही  केला. रामकृपाल पाटलीपुत्र मतदारसंघातून लढण्यास उत्सुक आहेत. या मतदारसंघातून राष्ट्रीय जनता दलाने लालूप्रसाद यांच्या कन्या मिसाभारती यांना उमेदवारी दिली.

सोशल मीडियावरील प्रचारालाही परवानगी आवश्यक
चेन्नई : लोकसभा निवडणुकीच्या आखाडय़ात उतरलेल्या राजकीय पक्षांकडून फेसबुक, ट्विटर यासारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सचा मोठय़ा प्रमाणात वापर होत असल्याने व याकामी प्रचंड पैसाही खर्च करण्यात येत असल्याने, आता निवडणूक आयोगाने याची दखल घेतली आहे. सोशल मीडियावरून निवडणुकीचा प्रचार करण्यापूर्वी राजकीय पक्ष वा उमेदवारांनी आयोगाच्या समितीची परवानगी घेण्याची सक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी प्रवीण कुमार यांनी दिली. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या अण्णा द्रमुक पक्षाने सोशल मीडियावरून प्रचार करण्याची योजना आखली आहे.