अरुणाचल प्रदेशमध्ये ३७ मतदान केंद्रांवर १९ एप्रिल रोजी फेरमतदान होणार आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे बिघडल्याने आणि निवडणुकीशी संबंधित हिंसाचारामुळे ९ एप्रिल रोजीचे मतदान स्थगित करण्यात आले होते. सकाळी ६ वाजल्यापासून ते दुपारी २ वाजेपर्यंत फेरमतदान घेण्यात येईल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. कुरुंग कुमे, पूर्व कामेंग, अपर सुबानसिरी, पश्चिम सियांग आणि पूर्व सियांग आदी जिल्ह्य़ांमध्ये फेरमतदान होणार आहे. ज्या ठिकाणी फेरमतदान होणार आहे तेथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पुरेशा तुकडय़ा तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन नक्षलवाद्यांना अटक
रायपूर : १७ तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येस पोलिसांवर तसेच जवानांवर हल्ला करण्याच्या दृष्टीने ठेवण्यात आलेले दोन ‘टिफिन बाँब’ वेळीच निकामी करण्यात यश आले आहे. तसेच, अन्य एका घटनेत दोघा नक्षलवाद्यांनाही अटक करण्यात आली आहे. राजमन सलाम (३५) आणि विनोद कोर्रम (२६) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा नक्षलवाद्यांची नावे आहेत.
पुरंदेश्वरी यांना उमेदवारी नाकारली
नवी दिल्ली : तेलंगणच्या प्रश्नावरून काँग्रेसशी फारकत घेऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी केंद्रीय मंत्री डी. पुरंदेश्वरी यांना भाजपने विशाखापट्टणम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारली आहे.आंध्र प्रदशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत एन. टी. रामाराव यांच्या कन्या असलेल्या पुरंदेश्वरी या विशाखापट्टणमच्या विद्यमान खासदार आहेत. याच मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळेल, अशा आशेवर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आंध्र प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष के. हरिबाबू यांना विशाखापट्टणम मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
मतदानपूर्व जनमत चाचण्यांना बंदी
नवी दिल्ली  : लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे १२ मेपर्यंत पूर्ण होत आहेत. त्यामुळे १२ मेपूर्वी निवडणूक निकालाची जनमत चाचणी प्रसिद्ध करण्यावर बंदी असून, या चाचण्या प्रसिद्ध केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा निवडणूक आयोगाने दिला आहे. ‘‘एका वृत्तवाहिनीने १४ एप्रिल रोजी मतदानपूर्व जनमत चाचणी प्रसिद्ध केली होती. या चाचणीमध्ये त्यांनी लोकसभेच्या १११ मतदारसंघाचे निकालही प्रसिद्ध केले होते, जिथे मतदानही झाले नव्हते. मात्र या जनमत चाचणीमुळे या मतदारसंघातील निकालावर परिणाम होऊ शकतो,’’ असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. निवडणूक आयोगाने या वृत्तवाहिनीचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख एनडीटीव्हीच्या जनमत चाचणीकडे होता.
अनिवासी भारतीयांचा मोदीप्रचार
अहमदाबाद : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी आता त्यांचे परदेशातील समर्थकही सरसावले आहेत. अमेरिकास्थित अनिवासी भारतीयांचा एक गट मोदींसाठी भारतात आला आहे. याच गटाने बराक ओबामा यांच्यासाठी २०१२ मध्ये झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा निधी उभारला होता. ‘ग्लोबल इंडियन्स फॉर भारत विकास’ संघटनेचे ६५० परदेशस्थ भारतीय स्वयंसेवक भारत बराई यांच्या नेतृत्वाखाली सध्या गुजरातमध्ये तळ ठोकून आहेत आणि ते ‘मोदी फॉर पीएम’ प्रचाराला चालना देत आहेत.
मोदी यांनी विकासाचा मुद्दा उचलून धरल्याने जनतेने त्यांना भरभरून मते द्यावीत, असे आवाहनही बराई यांनी केले.
तामिळींच्या हक्कांसाठी राजीव यांचे बलिदान सोनिया यांचे प्रत्युत्तर
कन्याकुमारी : लंकेतील तामिळींच्या प्रश्नाकडे काँग्रेस पक्ष दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. मात्र तो धादांत खोटा आणि खोडसाळ आहे. भारताच्या माजी पंतप्रधानांनी (राजीव गांधी) याच तामिळींच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आपला जीवही गमावला होता, याचे भान असू द्या, असे भावपूर्ण आवाहन काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले. तामिळनाडू येथील प्रचार रॅलीत त्यांनी जयललिता यांच्यावरही शरसंधान केले. ‘काँग्रेसने लंकेतील तामिळींसाठी काहीही केले नाही, असा आरोप काही पक्ष करतात. पण  राजीव यांनी – माझ्या यजमानांनी तामिळींच्या हक्कांसाठी आपले प्राणही वेचले. आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी देशासाठी एवढा त्याग केला आहे का,’ असा सवाल सोनिया यांनी केला.