उत्तर मध्य-मुंबई मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रिया दत्त यांच्या विरोधातील नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली शिष्टाई यशस्वी ठरली असून, अल्पसंख्याक विकासमंत्री नसीम खान आणि आमदार कृपाशंकरसिंह प्रचारात सहभागी झाले आहेत. प्रिया दत्त यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी रात्री झाले. यावेळी राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर उपस्थित होते. कृपाशंकर व नसीम खान यांनी प्रिया दत्त यांच्या प्रचारापासून दूर राहणे पसंत केले होते. या मतदारसंघातील गटबाजी तापदायक ठरू शकते हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी गेल्याच आठवडय़ात प्रिया दत्त, कृपाशंकर आणि नसीम खान यांच्यातील वाद मिटवले होते. प्रिया दत्त विश्वासात घेत नाहीत, अशी या दोन नेत्यांची तक्रार होती. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही नेत्यांनी प्रचारात सहभागी होण्याचे मान्य केले.
शरद पवार द. मुंबईचे मतदार
मुंबई : गेल्या चार दशकांपासून बारामतीचे प्रतिनिधित्व करणारे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यंदा प्रथमच बारामतीतील मतदानास मुकणार आहेत. कारण ते या मतदारसंघाचे मतदार नाहीत. गेल्या वर्षी मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याकरिता पवार यांनी मतदार म्हणून मलबार हिल मतदारसंघात आपले नाव नोंदविले. त्यामुळे त्यांचे बारामती मतदारसंघात नाव नाही. शिवाय पवार यांना दक्षिण मुंबई मतदारसंघात स्वपक्षीय उमेदवाराला मतदान करण्याचे भाग्यही लाभणार नाही. कारण या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निवडणूक िरगणात आहे. दरम्यान, दर निवडणुकीत प्रचार संपण्याच्या अखेरच्या दिवशी बारामतीमध्ये प्रचार करण्याची परंपरा यंदाही पवार यांनी कायम ठेवली.
राज्यात मोदींच्या तीन सभा
मुंबई : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी राज्यात दौऱ्यावर येत असून २०, २१ आणि २२ एप्रिलला त्यांच्या सभा होणार आहेत. मुंबईतील उमेदवारांच्या प्रचारासाठी वांद्रे-कुर्ला संकुलात त्यांची सभा २१ एप्रिलला सायंकाळी होणार आहे. मोदी यांची जळगाव येथे २० एप्रिलला सभा होणार आहे. मुंबईतील सभेआधी २१ एप्रिलला भिवंडी मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी कल्याण येथे मोदींची सभा होईल. नंदूरबार व धुळे येथे २२ एप्रिलला त्यांच्या सभा होणार आहेत.
‘कृष्णभुवन’ वर लग्नपत्रिका कोणी पाठवली होती?
ठाणे : ठाण्यातील शिवसेनेचा एक बडा नेता काँग्रेसच्या संपर्कात होता, या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आरोपांना उत्तर देताना आमदार एकनाथ शिंदे यांना कसरत करावी लागत असतानाच कल्याण मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी आपल्या प्रचारात नवा आरोप करत शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीच्या प्रचारानिमीत्त गृहमंत्री आर.आर.पाटील यांची डोंबिवलीत सभा झाली. त्यावेळी बोलताना परांजपे यांनी शिंदे यांच्या शिवसेना निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. शिवसेनेत असताना भावाच्या लग्नाची पत्रिका घेऊन मी राज ठाकरे यांच्या कृष्णभुवनवर जावे, असे आदेश मला शिंदे यांनी दिले. असे करणे योग्य होईल का, असा प्रश्न मी विचारताच ‘मातोश्री’ला टेन्शन देऊ या, असे उत्तर त्यांनी दिल्याचे परांजपे म्हणाले.
राजनाथ यांची मुस्लीम धर्मगुरूंशी चर्चा
लखनौ : भाजप अध्यक्ष आणि लखनौ येथील उमेदवार राजनाथ सिंह यांनी मुस्लीम धर्मगुरूंची भेट घेतली. राजनाथ यांच्यासमवेत स्थानिक खासदार लालजी टंडन आणि महापौर दिनेश शर्मा हे होते. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे उपाध्यक्ष कल्बे सादीक, मौलाना कल्बे जावेद, मौलाना हमीदुल हसन, मौलाना याकुब अब्बास, मौलाना महाली यांच्याशी भाजप नेत्यांनी चर्चा केली. मुस्लिमांना भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत ही चर्चा झाली. मुस्लिमांच्या शिक्षणावर भर द्यावा अशी अपेक्षा यात व्यक्त करण्यात आली. सौहार्दाच्या वातावरणात ही बैठक झाल्याचे मौलाना फरंगी महाली यांनी सांगितले.  
निवडणुक प्रचाराच्या रणधुमाळीत पैसे-मद्य यांचा महापूर
नवी दिल्ली : या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही संपूर्ण देशभरात आतापर्यंत २६९ कोटी रुपयांची रोकड आणि १३२ कोटी लिटर मद्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. याशिवाय १०४ किलोएवढा मोठा हेरॉइन या अमली पदार्थाचा साठाही जप्त केला आहे. निवडणूक आयोगातर्फे नेमलेल्या भरारी पथकांनी ही चोख कामगिरी बजावली असून या कारवाईत आंध्र प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयोगाच्या माहितीनुसार मंगळवापर्यंत आंध्र प्रदेशमध्ये १२९ कोटी, महाराष्ट्रात ३३.४६ कोटी, तामिळनाडूत १९.८७ कोटी, कर्नाटकमध्ये १२.२९ कोटी, उत्तर प्रदेशमध्ये १२ कोटी आणि पंजाबमध्ये पाच कोटींची रोकड जप्त करण्यात आली. पैशांच्या बेकायदेशीर वाटप प्रकरणी देशात १२ हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत.
१६ पराभव तरीही पुन्हा रिंगणात!
चंडीगड : लोकसभेच्या तीन, विधानसभेच्या सात आणि महापालिका समित्या, पंचायत अशा तब्बल १६ निवडणुकांमध्ये पराभूत होऊनही पंजाबमधील होशियारपूर मतदारसंघातून ७३ वर्षीय ओमप्रकाश झक्कू हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.व्यवसायाने चर्मकार असलेले ओमप्रकाश झक्कू जालंधरचे विद्यमान काँग्रेस खासदार मोहिंदरसिंग केपी, भाजपचे विजय संपाला आणि आम आदमी पार्टीच्या यामिनी गोमार यांच्याशी लढणार आहे.
नितीश यांना दणका
किसनगंज (बिहार) : किसनगंज लोकसभा मतदारसंघातील जद(यू)चे उमेदवार अख्तरुल इमान यांनी काँग्रेस उमेदवाराच्या समर्थनार्थ माघार घेतल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना चांगलाच धक्का बसला आहे. काँग्रेसचे विद्यमान खासदार मौलना असरारुल हक यांच्या समर्थनार्थ आपण निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे इमान यांनी जाहीर केले. किसनगंज मतदारसंघ अल्पसंख्यबहुल आहे. इमान यांनी अलीकडेच राजदचा राजीनामा देऊन जद(यू)मध्ये प्रवेश केला होता.
नॅशनल कॉन्फरन्स कार्यकर्त्यांवर हल्ला
श्रीनगर : नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांवर सोमवारी मध्यरात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. श्रीनगर शहरात राहत असलेल्या या कार्यकर्त्यांच्या घराजवळ दहशतवाद्यांनी पेट्रोलबॉम्ब फेकले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. मोहम्मद शफी लोन आणि गुलाम मोहम्मद भट अशी या कार्यकर्त्यांची नावे आहेत. या बॉम्बमुळे केवळ त्यांच्या घराच्या तावदानाचे नुकसान झाले.
योग शिबिरांमध्ये प्रचार नको
नवी दिल्ली :  योगगुरू रामदेवबाबा यांच्या योग शिबिरांच्या माध्यमातून भाजपचा प्रचार करण्यात येत असल्याची तक्रार अन्य राजकीय पक्षांकडून करण्यात आल्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली आह़े  योग शिबिरांचा वापर कोणत्याही पक्षाच्या निवडणूक प्रचारासाठी करण्यात येता कामा नये, असे आयोगाने बजावले आह़े  अशा शिबिरांच्या उद्घाटन किंवा समारोप सोहळ्यास राजकीय व्यक्तींना आमंत्रितही करता येणार नाही़  रामदेवबाबांच्या नुकत्याच झालेल्या शिबिरात नरेंद्र मोदी यांनी भाषण केले होत़े