औरंगाबाद जिल्हय़ातील गंगापूरचे अपक्ष आमदार प्रशांत बंब शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यांच्या प्रवेशास खासदार चंद्रकांत खैरेही अनुकूल असल्याची माहिती आहे. १५ ऑगस्टपर्यंत कार्यकर्त्यांशी चर्चा झाल्यानंतर सेनेत प्रवेश करण्याच्या मानसिकतेत ते आहेत. या मतदारसंघातून सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. या पाश्र्वभूमीवर बंब यांचा सेनेतील प्रवेश व खैरे यांची अनुकूलता यामुळे दानवे  समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे.
बंब शिवसेनेत येणार असतील तर त्यांचे स्वागत असेल, असे ‘लोकसत्ता’शी बोलताना खैरे म्हणाले. गंगापूर मतदारसंघातून निवडणुकीला इच्छुक सेनेतील नेत्यांची यादी मोठी आहे. या अनुषंगाने बोलताना आमदार बंब म्हणाले, की मी कार्यकर्त्यांशी चर्चा करीत आहे. ज्या पद्धतीने प्रश्न मांडले, मग तो जायकवाडीचा असो किंवा दुष्काळाच्या चारा छावण्यांचा, त्याचा सकारात्मक परिणाम व्हावा यासाठी एखाद्या पक्षात जावे, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.