जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारताच्या सत्तेच्या रणधुमाळीला अखेर बुधवारपासून सुरुवात झाली. लोकसभेच्या ५४३ जागांसह आंध्र प्रदेश, सिक्कीम आणि ओदिशा या राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केले. तब्बल नऊ टप्प्यांत विभागल्या गेलेल्या  निवडणुकीचा पहिला टप्पा ७ एप्रिलपासून सुरू होणार असून १२ मेपर्यंत चालणार आहे. १६ मे रोजी सर्व जागांची मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. महाराष्ट्रात १०, १७ आणि २४ एप्रिल रोजी तीन टप्प्यांत मतदान होणार असून मुंबई, ठाणे, कल्याण या भागांत २४ एप्रिल रोजी उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद होईल.  निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच आचारसंहिता तातडीने अंमलात आली आहे.
वाढवून देण्यात आलेला निवडणूक खर्च, मतदानाची कागदोपत्री नोंद, नकाराधिकार, दहा कोटी नवमतदार अशा विविध कारणांमुळे वैशिष्टय़पूर्ण ठरणारी ही निवडणूक ऐन उन्हाळय़ात देशातील राजकीय वातावरण अधिक तापवणारी ठरणार आहे. भाजपचे नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे राहुल गांधी यांच्यातील थेट टक्कर, या दृष्टिकोनातून या निवडणुकीकडे पाहिले जात असतानाच, तिसरी आघाडी, अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष यांनीही या निवडणुकीतील चुरस वाढवली आहे. मात्र, या साऱ्यांच्या केंद्रस्थानी असेल तो सामान्य मतदारच. गेली पाच वर्षे देशात सत्ता गाजवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या कामांचा हिशेब करतानाच, सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी आतूर असलेल्या विरोधकांच्या आश्वासनांचीही चाचपणी मतदारराजाला करावी लागणार आहे. त्यामुळे आजपासूनचे ७० दिवस या मतदारराजाचेच असणार आहेत.
आव्हान : आयोगाचे आणि आपले
१० एप्रिल
मतदारसंघ : १०
बुलडाणा, अकोला, अमरावती (अनु. जाती), वर्धा, रामटेक (अनु.जाती), नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर (अनु. जमाती), चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम.
निवडणुकीची अधिसूचना : १५ मार्च

उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस : २२ मार्च
अर्जाची छाननी : २४ मार्च.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस : २६ मार्च.

१७ एप्रिल
एकूण मतदारसंघ : १९
हिंगोली, नांदेड, परभणी, मावळ, पुणे, बारामती, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले.

२४ एप्रिल
एकूण मतदारसंघ : १९
नंदुरबार , धुळे, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, दिंडोरी , नाशिक, पालघर , भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड.

निवडणुकीची अधिसूचना : २९ मार्च
उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस : ५ एप्रिल.
अर्जाची छाननी : ७ एप्रिल.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस : ९ एप्रिल.

निवडणुकीची अधिसूचना : १९ मार्च
उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस : २६ मार्च
अर्जाची छाननी : २७ मार्च.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस : २९ मार्च.