अमेरिकेच्या ‘नॅशनल सिक्युरिटी एजन्सी’ अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेने भारतीय जनता पक्षावर २०१०पासून पाळत ठेवली होती, असे वृत्त प्रसिद्ध झाल्यामुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. केंद्रातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने या वृत्ताची गंभीर दखल घेत भारतातील अमेरिकेच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यास तातडीने बोलावले.  तसेच असे प्रकार यापुढे होणार नाहीत याची हमी अमेरिकेने द्यावी, अशी मागणीही भारताने केली आहे. मात्र समन्स बजावण्यात आलेल्या राजनैतिक अधिकाऱ्याचे नांव उघड करण्यास परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे.नॅन्सी पेलोसी यांनी भारतातील अमेरिकेच्या राजदूत या पदाचा राजीनामा दिल्यामुळे कॅथलीन स्टीफन्स यांची अमेरिकेने अंतरिम राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे त्यांनाच समन्स बजावण्यात आले आहे का याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. वॉशिंग्टन येथील अमेरिकी प्रशासनाकडे तसेच भारतातील अमेरिकी दूतावासाकडेही परराष्ट्र विभागाने या प्रश्नावर आपली नाराजी नोंदवली आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात एडवर्ड स्नोडेन याने काही भारतीय व्यक्ती आणि संघटनांवर अमेरिकेकडून पाळत ठेवली जात असल्याचा दावा करीत खळबळ उडवून दिली होती. त्यावेळीही परराष्ट्र खात्याने भारतातर्फे आपला निषेध व्यक्त केला होता.