‘शतप्रतिशत नरेंद्र मोदी’, असा धोशा भाजपने लावला असला तरी संघ स्वयंसेवकांनी त्याचा पाठपुरावा केलाच पाहिजे असे नाही, अशा आशयाचा सल्ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला आहे. भाजप हा राजकीय पक्ष असून संघ ही सामाजिक संघटना आहे, त्यामुळे स्वयंसेवकांनी भान ठेवून काम करावे, अशी सूचना सरसंघचालकांनी केली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वार्षिक अधिवेशन नुकतेच बेंगळुरूत पार पडले. या वेळी स्वयंसेवकांशी संवाद साधताना सरसंघचालकांनी वरीलप्रमाणे सल्ला दिला. ते म्हणाले की, ‘गेल्या दहा वर्षांपासून देशात अनाचार सुरू आहे. देशापुढील महत्त्वाच्या प्रश्नांकडे विद्यमान व्यवस्थेचे दुर्लक्ष होत आहे. लोकांमध्ये या मुद्दय़ांविषयी जनजागृती करणे हे संघाचे आद्यकर्तव्य असून राजकीय मुद्दे आपल्या अजेंडय़ावर असायला नको. त्यामुळे स्वयंसेवकांनी आपण राजकीय पक्ष नसून एक सामाजिक संस्था आहोत याचे भान ठेवावे व आपल्या मर्यादा लक्षात ठेवाव्यात आणि देशकेंद्रित प्रचार करावा’.
भागवत यांच्या या विधानाचा अर्थ काढत सरसंघचालकांनी स्वयंसेवकांना ‘नमो नमो’ला जास्त महत्त्व न देण्याची सूचना केली असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले. त्यावर खुलासा करताना संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी सरसंघचालकांना तसे काही सुचवायचे नसल्याचे स्पष्ट केले. भाजप हा राजकीय पक्ष असून संघ ही सामाजिक संघटना आहे. त्यामुळे दोघांनीही आपापल्या पातळीवर काम करून जनजागृती करणे इष्ट ठरते, असा सरसंघचालकांच्या विधानाचा अर्थ होतो, असे माधव म्हणाले. प्रसारमाध्यमांनी त्यांच्या वक्तव्याचे चुकीचे अर्थ काढू नयेत, असेही माधव यांनी स्पष्ट केले.
संघ केवळ देशापुढील महत्त्वाच्या प्रश्नांवरच जनमानसांत चर्चा घडवून आणेल तर भाजप त्यांच्या राजकीय मुद्दय़ावर चर्चा करेल, हेच योग्य असल्याची ट्विप्पणीही माधव यांनी खुलाशानंतर केली.