अमेठी मतदारसंघातून कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाने अभिनेत्री स्मृती इराणी यांना उमेदवारी दिली आहे. सोमवारी रात्री उशीरा इराणी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. राहुल गांधी यांच्या विरोधात आम आदमी पक्षाने याआधीच कुमार विश्वास यांना उमेदवारी दिली आहे. आता स्मृती इराणी यांना भाजपने तिकीट दिल्यामुळे अमेठीतील निवडणूक तिरंगी आणि रंगतदार होईल.
अमेठीतून भाजप कोणाला उमेदवारी देते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. त्यातच स्मृती इराणी यांच्यासारख्या व्यक्तीची निवड करण्यात आल्यामुळे या मतदारसंघातील निवडणुकीची चुरस वाढणार आहे.
रायबरेली मतदारसंघातून भाजपने अजय आगरवाल यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले. अजय आगरवाल समाजवादी पक्षातून भाजपमध्ये आले आहेत. मुळात रायबरेलीमधून उमा भारती यांना उमेदवारी द्यावी, याचा पक्षश्रेष्ठी विचार करीत होते. मात्र, झांशीसोडून इतर कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास उमा भारती यांनी साफपणे नकार दिला. त्या पार्श्वभूमीवर भाजपने या मतदारसंघातून अजय आगरवाल यांना उमेदवारी दिली आहे.