आंध्र प्रदेश विधानसभेत काळ्या पैशांच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्तारूड तेलुगु देसम पक्षाच्या सदस्यांनी प्रतिहल्ला चढविल्याने रेड्डी यांच्यावरच बूमरँग झाले.
विरोधी पक्षनेता म्हणून प्रथमच काम करताना रेड्डी यांनी मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराच्या प्रश्नावरून हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्तारूढ सदस्यांनी या बाबत रेड्डी यांच्याच या बाबतच्या ‘कामगिरी’चा पाढा वाचल्याने जगनमोहन रेड्डी यांचा जुगार फसला.
ज्याने १६ महिने तुरुंगाची हवा खाल्ली, ज्याची ११०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली, ज्याच्यावर एक लाख कोटी रुपयांची माया जमविल्याचा आरोप आहे, सीबीआयने ज्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आणि ४३ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले, असा अन्य सदस्य सभागृहात आहे का, असे सवाल विधिमंडळ कामकाजमंत्री यनमला रामकृष्णनुडू यांनी करताच सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांनी बाके वाजवून त्याचे जोरदार स्वागत
केले.
या प्रश्नांनी गांगरलेले जगनमोहन रेड्डी निरुत्तर झाले, तेलुगु देसम पक्षाने त्यांच्यावर सरळ हल्ला चढविला. सभागृहात काळ्या पैशांबाबतचा ठराव मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मांडला होता आणि त्यावर चर्चा सुरू असताना हा सर्व प्रकार घडला.

भ्रष्टाचारमुक्त भारत निर्मितीचा आंध्र विधानसभेत ठराव
भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण करण्यासाठी आणि काळ्या पैशांचा स्रोत नष्ट करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलावीत, अशी विनंती करणारा ठराव मंगळवारी आंध्र प्रदेश विधानसभेत पारित करण्यात आला.भ्रष्टाचारमुक्त आंध्र प्रदेश निर्माण करण्याचे आणि काळ्या पैशांचा स्रोत नष्ट करण्यासाठी केंद्र सरकारला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन विधानसभेतील ठरावाद्वारे देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी हा ठराव मांडला.परदेशातील काळा पैसा परत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत विशेष तपास पथकाची स्थापना केली. स्विस बँकेत ज्या व्यक्तींचे खाते आहे त्यांची नावे कळविण्याबाबत केंद्र सरकारने मंगळवारीच तेथील सरकारला पत्र लिहिले आहे. मोदी सरकारची ही निर्णायक कृती आहे, असे नायडू यांनी म्हटले आहे.