News Flash

अशांत ‘नंदनवनात’ सत्ताधाऱ्यांची कसोटी

‘भारताचे नंदनवन’ अशी ओळख असणारे जम्मू-काश्मीर हे राज्य देशातील सर्वात संवेदनशील राज्य म्हणूनही ओळखले जाते. गेली ६७ वष्रे हे राज्य सतत धगधगत राहिले.

| March 27, 2014 03:54 am

‘भारताचे नंदनवन’ अशी ओळख असणारे जम्मू-काश्मीर हे राज्य देशातील सर्वात संवेदनशील राज्य म्हणूनही ओळखले जाते. गेली ६७ वष्रे हे राज्य सतत धगधगत राहिले.  राज्यात कायदा व सुव्यवस्थेची घडी बसविणे ही सर्वच पक्षांसमोरील आव्हान आहे.
लोकसभेचे सहा मतदारसंघ असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये पाच टप्प्यांत निवडणूक होणार आहे, यावरून हे राज्य किती संवेदनशील आहे याची प्रचीती येते. एका बाजूला पाकिस्तानसारख्या शेजारी राष्ट्रचा आ वासलेला जबडा, दहशतवाद्यांच्या सतत होणाऱ्या कारवाया, फुटिरतावाद्यांच्या वारंवार होणाऱ्या चळवळी यांमुळे हे राज्य सतत अशांत राहिले. लोकसभा निवडणुकीत सहा मतदारसंघांसाठी अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस, पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) आणि भाजप या महत्त्वाच्या पक्षांमध्ये खरी लढत होणार आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची गेल्या पाच वर्षांपासून आघाडी असून, यंदाही ते एकत्रितपणेच निवडणूक लढणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी हे नेहमीच एकमेकांचे राजकीय विरोधक राहिले आहेत. त्यामुळे नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेसकडे झुकली असल्याने केंद्रातील सत्तेचा फायदा घ्यायचा असेल, तर पीडीपीसमोर युतीसाठी भाजप हा पर्याय आहे. पीडीपीचे सर्वेसर्वा मुफ्ती मोहम्मद सईद यांनी नुकतीच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गुणगान गाऊन वाजपेयी पंतप्रधान असताना काश्मीरमध्ये सुवर्णकाळ होता, असे वक्तव्य केले होते. मात्र भाजप आणि पीडीपी या दोन्ही पक्षांच्या विचारसरणीत फरक असल्याने दोन्ही पक्षांना जुळवून घेणे अवघड आहे.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी बुधवारीच आपल्या ‘भारत विजय सभे’ची सुरुवात काश्मीरमधूनच केली. गुजरातच्या विकासाचा मुद्दा मोदी यांनी या सभेतही वदला. मात्र तेथील दहशतवादी कारवायांवर आळा घालण्याबाबतची भाजपची धोरणे काय आहेत याबाबत मोदींनी भूमिका स्पष्ट केलेली नाही.
काहीही उच्चार केलेला नाही. काँग्रेसने केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांना रिंगणात उतरवले आहे. दोनदा महाराष्ट्रातून लोकसभेवर जाणारे आझाद प्रथमच घरच्या मैदानात निवडणूक लढवणार आहे. नॅशनल कॉन्फरन्सने आमची आघाडी राज्यातील सर्वच जागा जिंकून आणेल, असा विश्वास निर्माण केला असला तरी, त्यांना पीडीपीचे आणि मोदी लाटेमुळे भाजपचे मोठे आव्हान आहे.

मतदानाचा टक्का वाढविणे गरजेचे
जम्मू-काश्मीरमध्ये मतदानाची टक्केवारी ही अत्यल्प असल्याने ती वाढविणे हे मोठे आव्हान आहे. २००९च्या लोकसभा निवडणुकीत या राज्यात केवळ ३९.७ टक्के मतदान झाले. देशभरातील एकूण राज्यांपैकी सर्वात कमी मतदान जम्मू-काश्मीरमध्येच झाले. मतदारांमध्ये मतदानाबाबत जागरूकता आणि लोकशाहीबाबबत आपलेपणा निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे.
प्रमुख मुद्दे
वाढता दहशतवाद, नागरी हक्कांचा प्रश्न, कलम ३७०, काश्मिरी विस्थिापितांचा प्रश्न, काश्मिरी पंडितांचा प्रश्न, काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित करणे, फुटिरतावादी चळवळी, सीमांर्तगत घुसखोरी रोखणे, नॅशनल कॉन्फरन्सच्या सत्तेत झालेला रोशणी जमीन अधिग्रहण घोटाळा, औषध वितरण घोटाळा.

प्रमुख लढती
उधमपूर-दोडा : गुलाम नबी आझाद (काँग्रेस),
डॉ. जितेंदर सिंग (भाजप)
श्रीनगर-बडगार : डॉ. फारूख अब्दुल्ला (नॅ.कॉ.), तारिक हमीद (पीडीपी), राजा मुझफ्फर  (आप)
अनंतनाग-पुलवामा  : मेहबूबा मुफ्ती (पीडीपी), मेहबूब बेग (न. कॉ.),

२००९ बलाबल
एकूण जागा ६

नॅशनल कॉन्फरन्स ३
काँग्रेस २
इतर १

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 3:54 am

Web Title: jammu kashmir lok sabha election challenge to ruling party
Next Stories
1 रिपब्लिकन नेते सत्तेच्या स्वप्नात गुंग..
2 मुख्यमंत्र्यांचा आक्षेप, मात्र सोनिया ठाम
3 चव्हाणांना ‘आदर्श’मधून वगळण्यासाठी सीबीआयची उच्च न्यायालयात धाव
Just Now!
X