ईंशान्य मुंबई मतदारसंघात भाजपचे किरीट सोमय्या यांना शह देण्याकरिता राष्ट्रवादीने मोठय़ा खुबीने मराठी कार्ड वापरून मराठी मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळेच या लढतीला जय महाराष्ट्र विरुद्ध जय गुजरातचे स्वरूप आले आहे.
या मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार संजय पाटील आणि भाजपचे किरीट सोमय्या यांच्यात लढत होत आहे. आम आदमी पार्टीच्या मेधा पाटकर यासुद्धा रिंगणात आहेत. या मतदारसंघात दोन लाखांपेक्षा जास्त गुजराती मतदार असल्याने सोमय्या यांनी या मतांचे ध्रुवीकरण होईल अशा पद्धतीने व्यवस्था केली. मोदी घटकामुळे गुजराती समाजाचे एकगठ्ठा मतदान होण्याबाबत भाजप आशावादी आहेत. मोदी यांनी गुजरात मतदारांवर अधिक लक्ष केंद्रित केल्याने राष्ट्रवादीने मराठी कार्डचा वापर सुरू केला. जाणिवपूर्वक मराठी विरुद्ध गुजराती मतांचे विभाजन होईल, अशी खेळी खेळण्यात आली. सोमय्या हे फक्त गुजराती मतदारांची काळजी घेतात, असा प्रचार सुरू करण्यात आला. मराठी मते आपल्याकडे वळावीत, अशी राष्ट्रवादीची योजना आहे. गेल्या वेळी मनसेमुळेच राष्ट्रवादीचा विजय सुकर झाला होता. यंदा मनसेचा उमेदवार नसल्यानेच राष्ट्रवादीने मराठी कार्ड वापरून शिवसेना आणि मनसेच्या मतांकडे लक्ष केंद्रित केले आहे.
ईशान्य मुंबईत भाजपने जातीय आणि भाषक प्रचार सुरू केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. या संदर्भात राष्ट्रवादीने आयोगाकडे तक्रार केली असून,
न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. राष्ट्रवादीने तक्रार आणि याचिकेत सहा तक्रारींचा हवाला देत पुरावे सादर केल्याची माहिती अ‍ॅड. उमेश मोहिते यांनी दिली. सोमय्या यांनी मात्र राष्ट्रवादीच्या आरोपांचा स्पष्टपणे इन्कार केला. पराभव दिसू लागल्यानेच राष्ट्रवादीने मराठी विरुद्ध गुजराती हा वाद उकरून काढल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.