जितनराम मांझी सरकारने  विश्वासदर्शक ठराव जिंकला
पाटना: नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या जितनराम मांझी यांच्या सरकारने शुक्रवारी विश्वासदर्शक ठराव जिंकला. विशेष म्हणजे, एकेकाळी संयुक्त जनता दलाचा कट्टर विरोधक मानल्या गेलेल्या राष्ट्रीय जनता दलाने आणि काँग्रेसने या सरकारला पाठिंबा दिला आहे. बिहार विधानसभेत एकूण सदस्यांची संख्या २३७ असल्याने बहुमतासाठी ११९ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. मात्र मांझी सरकारच्या बाजूने १४५ मते मिळाल्याने सत्ता स्थापन करण्याच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे. संयुक्त जनता दलाच्या ११७ सदस्यांसह राजदच्या २१, काँग्रेसच्या चार, भाकपच्या एक आणि दोन अपक्ष आमदारांनी सरकारच्या बाजूने मतदान केले.

अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध पुढील आठवडय़ात आरोपनिश्चिती
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात आरोप निश्चित करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने शुक्रवारी घेतला. पेडन्यूज आणि निवडणूक खर्चाचा अयोग्य तपशील दिल्याच्या खटल्याची नियमित सुनावणी येत्या ३० मेपासून सुरू करण्यात येणार आहे.अशोक चव्हाण यांच्या वकिलांचे पथक शुक्रवारी निवडणूक आयोगासमोर हजर झाले. या प्रकरणाची अंतिम सुनावणी होण्यापूर्वी त्यांच्याविरुद्ध विशिष्ट आरोप निश्चित करण्याचे या वेळी ठरविण्यात आले. चव्हाण आणि त्यांच्याविरुद्धचे तक्रारदार यांना आपापले म्हणणे मांडण्यासाठी पुढील आठवडय़ापर्यंत मुदत देण्यात आली असून त्यानंतर आरोप निश्चित केले जाणार आहेत.

जसवंत सिंह यांचे भाजपमध्ये पुनरागमन?
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्याने भाजपमधून बाहेर पडलेले माजी परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह हे पुन्हा पक्षात येण्याची चिन्हे आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची त्यांनी शुक्रवारी भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी तब्बल ३० मिनिटे चर्चा केल्यानंतर जसवंत सिंह यांच्या भाजप पुनरागमनाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.जसवंत सिंह यांना लोकसभा निवडणुकीत बारमेर मतदारसंघातून उमेदवारी हवी होती. मात्र पक्षनेतृत्वाने उमेदवारी नाकारल्याने जसवंत सिंह यांनी बंड पुकारले. त्यांनी या मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्यांना उमेदवारी मागे घेण्याची सूचना पक्षनेतृत्वाने केल्यानंतरही जसवंत यांनी त्यास दाद न दिल्याने त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु ?
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत धूँवाधार विजय मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आता दिल्ली विधानसभेवर लक्ष केंद्रित केले आहे. माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या मानहानी प्रकरणात जामीन घेण्याऐवजी न्यायालयीन कोठडीचा पर्याय स्वीकारून आम आदमी पक्षाचे समन्वयकअरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत दिल्लीच्या सातही जागांवर आम आदमी पक्षाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे विधानसभा निवडणूक झाल्यास बहुमत मिळण्याची ‘आप’ला आशा आहे. केजरीवाल यांच्या नव्या डावपेचांमुळे भाजपने सावधपणे विधानसभेची चाचपणी सुरू केली आहे.
केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत न्यायालयाने ६ जूनपर्यंत वाढ केली आहे. भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केजरीवाल यांनी केले होते. गडकरी यांनी त्यांच्यावर बदनामीचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी जामीन देण्यास नकार दिल्याने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. या तुरुंगवासाचा दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उपयोग करण्याची खेळी केजरीवाल खेळत आहेत.

३६
जम्मू-काश्मीरमधील लडाख या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराने अवघ्या ३६ मतांनी प्रतिस्पध्र्यावर मात केली. यंदाच्या निवडणुकीत सर्वात कमी फरकाने मिळविलेला हा विजय आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना कमी फरकानेच विजय मिळाला आहे.

प्रियांका गांधी यांना नेतृत्व द्या!
प्रियांका गांधी या मोठय़ा लढवय्या नेत्या आहेत. जनतेला पक्षाशी जोडण्याची क्षमता त्यांच्याकडे अंगभूत आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्त्वाची धुरा त्यांच्या खांद्यावर देण्यास काहीच हरकत नाही. प्रियांका यांच्यात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाची झलक दिसते. त्यामुळे सोनिया आणि राहुल यांच्यासोबत टीम म्हणून प्रियांका आघाडीच्या फळीत चांगले काम करतील.
– के. व्ही. थॉमस, मावळते अन्नमंत्री
बिहारमध्ये सत्ता टिकविण्यासाठी संयुक्त जनता दलाशी राष्ट्रीय जनता दलाने केलेली युती अनैतिक आहे. देशहितासाठी नव्हे, तर स्वार्थासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. गेल्या २० वर्षांपासून एकमेकांवर टीकेची झोड उठविणारे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत, कारण एक पक्ष सत्तेबाहेर राहू शकत नाही आणि दुसरा पक्ष कुटुंबाविना राहू शकत नाही. बिहारमध्ये जो विकास झाला, तो जनतेने भाजपच्या पारडय़ात मतदान केल्यामुळे झाला आहे.  माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे राजीनामा प्रकरण म्हणजे एक नाटक आहे.
रामकृपाल यादव, भाजप नेते