आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या आंध्र प्रदेश विधानसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ सदस्य के. शिवप्रसाद राव यांची एकमताने निवड झाली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष पी. नारायणस्वामी नायडू यांनी शिवप्रसाद राव यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर हंगामी अध्यक्षांनी शिवप्रसाद राव यांना सन्मानाने अध्यक्षांच्या आसनाजवळ नेले.
मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, विरोधी पक्षनेते वायएस जगनमोहन रेड्डी, विधिमंडळ कामकाजमंत्री यनमला रामकृष्णनुडू आणि अन्य आमदारांनी शिवप्रसाद राव यांना सन्मानाने अध्यक्षांच्या आसानावर बसविले.के. शिवप्रसाद राव हे व्यवसायाने शल्यविशारद असून ते गुंटूर जिल्ह्य़ातून सहा वेळा निवडून आले आहेत. त्यांनी गृह, जलसंपदा, पंचायत राज, ग्रामीण विकास आणि आरोग्य अशा विविध खात्यांचे मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.