मध्यरात्रीच्या सुमाराला पबमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर दोघा पोलीस कॉन्स्टेबलवर हल्ला करणारे काँग्रेसचे आमदार आणि त्यांच्या सहा समर्थकांना अटक करावी, अशी आग्रही मागणी भाजपच्या सदस्यांनी विधानसभेत केली. त्यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ झाल्याने कर्नाटक विधानसभेचे कामकाज ७ जुलैपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
पबमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर काँग्रेसचे आमदार विजयानंद काशपन्नवार हे २ जुलैपासून फरारी असून, सरकार त्यांना पाठीशी घालीत असल्याचा आरोप भाजपच्या सदस्यांनी सभागृहाचे कामकाज सुरू होताच केला आणि प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याची मागणी केली.
काँग्रेसचे सदर आमदार वृत्तवाहिन्यांवर स्पष्टीकरण देत असल्याचे सर्वानी पाहिले आहे, तरीही सरकार मात्र ते फरारी असल्याचे सांगते, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यामुळे सरकार या आमदारांना पाठीशी घालीत असल्याचा संशय येतो, असे विरोधी पक्षनेते जगदीश शेट्टर म्हणाले.
पबमध्ये मध्यरात्रीपर्यंत धिंगाणा घालण्यास तीव्र हरकत घेणारे कॉन्स्टेबल किरणकुमार आणि प्रशांत नाईक यांना काशपन्नवार आणि त्यांच्या सहा समर्थकांनी मारहाण केली. त्यामुळे आमदार आणि त्यांच्या समर्थकांवर हल्ल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.प्रश्नोत्तराचा तास रद्द करून त्यावर चर्चा करण्याची मागणी भाजपने केली. त्याला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हरकत घेतली. हा भयंकर प्रघात आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. सभागृहातच अश्लील चित्रफीत पाहणाऱ्या भाजपच्या सदस्यांकडून औचित्याचे धडे घेण्याची आम्हाला गरज नाही, असे सिद्धरामय्या म्हणाले.