देशात आम आदमीची संख्या जेवढी असेल त्यापेक्षा किती तरी पटीने सध्या आम आदमी पक्ष आणि त्या पक्षाचे निमंत्रक वजा सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची चर्चा होत आहे. दिल्लीत भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या वेळी आण्णा हजारे यांच्या उशा-पायशाला बसून आणि कानाला लागून केजरीवाल यांनी राजकारणात कधी टुणकन उडी मारली ते अण्णांना कळलेच नाही. आण्णांच्या आंदोलनामुळे मोठे झालेले आणि ४९ दिवसांसाठी का असेना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर आरूढ होण्याची संधी मिळालेले केजरीवाल मात्र आण्णांना पार विसरून गेले. आण्णांपेक्षा आता आपणच कसे सुशासन, सुप्रशासन, सुव्यवस्था अशा सुस्वप्नातील सरकारच्या राजकीय चळवळीचे प्रणेते आहोत, असे सांगत सुटले आहेत. तेच सांगायला ते मागील आठवडय़ात १२ मार्चला मुंबईत आले. केजरीवाल मुंबईत येणार-येणार म्हणून आपवाल्यांनी माध्यमांमधून चर्चा घडवून आणण्याची एकही संधी दवडली नाही. केजरीवाल विमानाने मुंबई विमानतळावर उतरणार, पण पुढे ते रिक्षा आणि लोकलने फिरणार, अशी दवंडी दिली गेली. रिक्षावाला तयार ठेवला होता. विमानतळ ते अंधेरी आम आदमी रिक्षावाल्याने केजरीवाल यांना अंधेरी रेल्वे स्थानकावर आणून सोडले. त्याचे म्हणे ३८ रुपयांचे भाडे केजरीवाल यांनी दिले. पुढे त्यांनी अंधेरी ते चर्चगेट लोकलचा प्रवास केला. तोही फुकट नाही. त्यासाठी १० रुपये मोजले. आता केजरीवाल यांना बघायलाच इतकी गर्दी झाली की, रेटा-रेटी झालीच. या गोंधळात धातूशोधक चौकट पडली, की पाडली, का तुटली, का तोडली असे काही तरी घडले. गृहमंत्री आर.आर.पाटील त्यावर प्रतिक्रिया द्यायला टपूनच बसले होते. धातूशोधक चौकट तोडली म्हणजे काय, कायदा व सुवव्यस्थेलाच आव्हान की हो. आबा म्हणाले चौकशी करून नुकसानीची वसुली केली जाईल, कुणालाही सैल सोडले जाणार नाही. आता आली का पंचाईत. सांताक्रूझ विमानतळ ते चर्चगेट आम आदमी सारखा केजरीवाल यांनी टोटल ४८ रुपयात प्रवास केला. आता धातू शोधक चौकटीच्या मोडतोडीचे म्हणे ४८ लाखाचे बिल त्यांच्यावर लावले जाणार आहे. हॉटेलात गेलेल्या गिऱ्हाईकाने काही तरी खाण्या-पिण्याच्या आधीच ग्लास हातातून फुटावा आणि त्याचेच बिल भरण्याची त्याच्यावर वेळ यावी. केजरीवाल व त्यांच्या आम आदमीवाल्यांचे तसेच झाले म्हणायचे. खाया-पिया कुछ नही गिलास तोडा बारा आना…