नरेंद्र मोदींची लाट रोखण्यासाठी काँग्रेसशी हातमिळवणी करण्याचा आम आदमी पक्षाचा प्रयत्न निष्फळ ठरला आहे. ४९ दिवसांच्या कारभारानंतर पळ काढणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना काँग्रेसने दुसऱ्यांदा पाठिंबा देण्यास नकार दिल्याने आम आदमी पक्षाचे धाबे दणाणले आहेत. फेब्रुवारीत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर सातत्याने दिल्ली विधानसभा विसर्जित करण्याची मागणी करणाऱ्या आम आदमी पक्षाने मंगळवारी विधानसभा संस्थगित ठेवण्याची विनंती नायब राज्यपाल नजीब जंग यांना केली. लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या निर्विवाद बहुमतामुळे विधानसभा निवडणूक झाल्यास निभाव लागणार नसल्याच्या भीतिपोटीच केजरीवाल यांनी नवनव्या युक्त्या शोधून काढल्या आहेत. त्यामुळे गडकरींनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात केजरीवाल यांनी न्यायालयीन कोठडीचा पयार्य निवडला. मात्र काँग्रेस-भाजपच्या विखारी टीकेमुळे केजरीवाल यांची खेळी व्यर्थ ठरली. चर्चेत राहण्यासाठी केजरीवाल यांनी न्यायालयीन कोठडी पत्करली. तत्पूर्वी त्यांनी काँग्रेससमवेत सत्तास्थापनेसाठी बोलणी केली होती. मात्र प्रदेशाध्यक्ष अरविंदरसिंह लवली यांचा केजरीवाल यांना विरोध आहे.  लोकसभा निवडणुकीत सातही जागांवर त्यांचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. भाजपला ४१ तर आपला ३१ टक्के मते मिळाली आहेत.
केजरीवाल सत्तापिपासू आहेत. त्यांना जनलोकपाल सोडाच जनतेच्या समस्यांशीदेखील देणे-घेणे नाही. त्यामुळे ते पुन्हा सत्तास्थापनेची स्वप्ने पाहू लागले आहेत. परंतु आम आदमी पक्षाला पाठिंबा न देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.
मुकेश शर्मा,दिल्ली काँग्रसचे प्रवक्ते