एकेकाळी पर्यटनाचे केंद्रस्थान म्हणून ओळखले जाणारे केरळ राज्य आज दहशतवादाचे नंदनवन म्हणून ओळखले जाऊ लागल्याची टीका करत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी केरळ राज्यसरकारवर निशाणा साधला.
नरेंद्र मोदी म्हणाले की, “काँग्रेसपक्ष कलिंगडासारखा बाहेरून हिरवा आणि आतून लाल आहे. इटलीच्या नौसैनिकांनी भारतीय मच्छिमारांना ठार केले यावर सरकारचे मात्र, हाताची घडी आणि तोंडावर बोट होते. नौदलात युद्धनौकांच्या दुर्घटना का होत आहेत? नौदलप्रमुखांना राजीनामा देण्याची वेळ का येते? यावर पंतप्रधान असोत, केरळचे मुख्यमंत्री असोत वा संरक्षणमंत्री कोणीही माझ्या प्रश्नांना उत्तर देऊ शकणार नाही.” असेही मोदी म्हणाले. तसेच “केरळमध्ये संपूर्ण देशाला मीठ पुरविण्याची क्षमता आहे यादृष्टीने सरकारने कधीच काम केले नाही. देशात महिलांवरील अत्याचारांच्या बाबतीत राज्यांवर नजर टाकली असता, यात भाजप सरकारचे कोणतेही राज्य आढळणार नाही. महिलांवरील गुन्हेगारीच्या बाबतीत यूपीए सरकारचीच राज्ये अग्रेसर आहेत आणि यात केरळ राज्याचाही समावेश आहे. केरळ राज्याची प्रगती यूपीए सरकारमुळे खुंटली आहे. विकासाच्या बाबतीत केरळमध्ये उत्तम संधी उपलब्ध आहेत परंतु, कोणताच विकास येथे झालेला नाही.” असेही ते पुढे म्हणाले.